ताज हॉटेलमध्ये एका अनिवासी भारतीयाला केलेल्या मारहाणप्रकरणी अभिनेता सैफ अली खान याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुनावणीला हजर राहण्याचे वारंवार आदेश देऊनही सैफ हजर राहत नसल्याने त्याच्या नावे वॉरंट बजावण्यात यावे, अशी मागणी सरकारी पक्षाकडून सोमवारी करण्यात आली. न्यायालयाने त्याची दखल घेत सैफला पुढील सुनावणीच्या वेळेस हजर राहण्यास बजावले आहे. तसेच गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याची ताकीदही दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे.
२२ फेब्रुवारी २०१२ रोजी सैफ कुटुंबीय व मित्रांसोबत हॉटेल ताजमहल येथे गेला होता. त्या वेळेस शेजारीच आपल्या कुटुंबीयांसोबत बसलेल्या अनिवासी भारतीयासोबत त्याची आधी शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर त्याचे रूपांतर या अनिवासी भारतीयाला मारहाण करण्यात झाले. त्यानंतर सैफविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी सैफवर सध्या मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला सुरू आहे. परदेशी वास्तव्यास असूनही तक्रारदार सुनावणीस हजर राहतात, परंतु भारतात असून आणि वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही सैफ हजर होत नाही. त्यामुळे त्याच्या नावे वॉरंट बजावण्याची मागणी करणारा अर्ज सरकारी पक्षाने सोमवारच्या सुनावणीच्या वेळेस केला. न्यायालयाने त्याची दखल घेत सैफला पुढील सुनावणीच्या वेळेस हजर राहा अन्यथा वॉरंट बजावण्याची ताकीद दिली.
वारंवार गैरहजर राहणाऱ्या सैफला न्यायालयाची ताकीद
ताज हॉटेलमध्ये एका अनिवासी भारतीयाला केलेल्या मारहाणप्रकरणी अभिनेता सैफ अली खान याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

First published on: 08-04-2015 at 07:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be present or face warrant court last chance to saif ali khan