करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प झालं होतं. त्यामुळे कधीही न थांबणारी मनोरंजनसृष्टी या लॉकडाउनच्या काळात बंद झाली होती. मात्र आता लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विशेष म्हणजे या अनलॉकमुळे पुन्हा एकदा मनोरंजसृष्टी जोमाने उभी राहिली असून ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर मराठी कलाविश्वातील ‘मनाचे श्लोक’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शिक ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचं जवळपास संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र या चित्रपटातील काही महत्त्वाच्या भागांचं शेवटच्या दोन दिवसांमध्ये चित्रीकरण करायचं होतं. त्यानंतर हा संपूर्ण चित्रपट तयार होणार होता. मात्र अखेरच्या या दोन दिवसांमध्येच लॉकडाउनची घोषणा करण्यात आली त्यामुळे हे चित्रीकरण अर्ध्यावर राहिलं होतं. मात्र अनलॉक होताच चित्रपटाच्या टीमने योग्य काळजी घेत हे चित्रीकरण पूर्ण केलं आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
अनलॉकच्या काळात चित्रीकरण करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने राज्य सरकारकडून रितसर परवानगी मिळविला असून या चित्रपटात मृण्मयी आणि राहुल पेठे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘शासनाने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे हे कळताच आम्ही सगळेच कामाला लागलो. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो आणि सर्व नियम पाळून चित्रीकरण करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देत आम्ही परवानगी मिळविली’ असे चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, या चित्रीकरणावेळी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं. सेटवर संपूर्ण टीम एकाच वेळी येऊ शकत नसल्यामुळे एका माणसाने चक्क तीन माणसांची जबाबदारी पेलली. तसंच या काळात प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला. मनाचे श्लोकचं मुळशी रोडवरील गरुड माची या गावात चित्रीकरण झालं असून चित्रीकरणानंतर संपूर्ण गाव सॅनिटाइज करण्यात आलं.