तसं सर्वच नात्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात राजकारण हे असतंच. तरीही सर्वाधिक राजकारणग्रस्त नातं कोणतं असेल, तर ते नवरा-बायकोचं! मग ते ठरवून केलेलं लग्न असो वा प्रेमविवाह! ठरवून केलेलं लग्न हा तर बोलूनचालून व्यवहारच असतो. त्यामुळे प्रतिपक्षापेक्षा आपल्या पदरी अधिकचं काही पाडून घेण्यासाठी आवश्यक ते डावपेच त्यात गृहीतच आहेत. अशा ठरवून झालेल्या लग्नानंतर नवरा-बायकोना परस्परांना समजून घेताना, एकमेकांचे गुण-दोष, सवयी, आवडीनिवडींशी जुळवून घेताना त्यांच्या वागण्या-बोलण्यात मनातलं आणि व्यवहारातलं असं वेगवेगळं जग असतंच. प्रेमविवाहातही वरपांगी जरी व्यवहार आढळत नसला तरी उभयपक्षी समोरच्याला पटवण्याच्या (की गटवण्याच्या?) पहिल्या पायरीपासूनच धूर्तपणे व्यूहरचना केलेली असतेच. हे करताना वर्तमान आणि भविष्यातील फायद्या-तोटय़ाचा विचार नसतोच असं म्हणणं धाष्टर्य़ाचं ठरेल. आणि एकदा का दोघं बोहोल्यावर चढले, की मग तर बघायलाच नको. त्याक्षणीच नवरा व बायको नामक दोन नव्या प्रजाती जन्माला येतात. त्यानंतर त्यांचं सहजीवन हा सृजनशील आणि सामान्यजन अशा दोन्हींसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरतो. अगदी खुद्द त्या जोडप्यासाठीही!
नवरा-बायकोच्या नात्यातील या गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या असंख्य कलाकृती आजवर जन्माला आल्या आहेत. यापुढेही येत राहतील. निखिल रत्नपारखी लिखित-दिग्दर्शित-अभिनित ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ हे नाटकही त्यास अपवाद नाही. याआधी त्यांचं ‘टॉम आणि जेरी’ हे आजच्या युगातील व्यक्तिवादी विचारांच्या जोडप्याच्या सहजीवनावरील भेदक नाटक येऊन गेलेलं आहे. वर्तमानाचा आरसा दाखवणारं हे नाटक लक्षवेधी होतं. ‘बेगम मेमरी..’चा प्रारंभ ज्या नोटवर होतो त्यावरून सुरुवातीला तरी आपण ‘टॉम आणि जेरी’चाच पुढचा भाग पाहतोय की काय असा समज होतो.. जो पुढे खोटा ठरतो. हे नाटक नवरा-बायकोतल्या वितंडवादांवरचं नाटक आहे. जरी यातली पात्रं आजची असली तरी त्यांच्यात जे काही घडतं ते मळलेल्या वाटेवरचंच आहे. फक्त त्याची मांडणी अनोखी वाटावी अशी ताजी तरतरीत आहे.
खरं तर हे नाटक पूर्णपणे वेगळं वेळणही घेऊ शकलं असतं. माणसाला नकोशा असलेल्या आठवणी वैज्ञानिक तंत्राने कायमच्या पुसून टाकण्याच्या यात योजलेल्या अभिनव संकल्पनेचा सखोल विचारांती वापर केला गेला असता तर हे नाटक निश्चितच आगळं ठरलं असतं. परंतु ही संकल्पना र्अधकच्ची वापरली गेली. खरं तर तीत अनेक नाटय़पूर्ण शक्यता दडलेल्या होत्या. निखिल रत्नपारखी या कल्पनेच्या गाभ्यात शिरले असते तर काहीतरी वेगळं, भन्नाट त्यांच्या हाती लागलं असतं. असो. परंतु सद्य:परिस्थितीतही त्यांनी विनोदाच्या ताज्या क्लृप्त्या योजून नाटक हास्यस्फोटक केलं आहे. एक तल्लख, बुद्धिमान लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून फार्सिकल कॉमेडीवरची त्यांची हुकुमत त्यातून दिसून येते.  
घन:श्याम गायकैवारी याची बायको गेले काही दिवस बेपत्ता आहे. तो तिचा शोध घेत डॉ. नवरंगे या न्यूरॉलॉजिस्टच्या क्लीनिकमध्ये येतो. ती तिथंच आली असावी असा त्याचा कयास असतो. डॉ. नवरंगे हे माणसाच्या आयुष्यातील त्याला नकोशा वाटणाऱ्या आठवणी पुसून टाकण्याच्या तंत्रज्ञानावर सहकारी डॉक्टरांसमवेत काम करत असतात. असं एक यंत्र त्यांनी बनवलेलं असतं; ज्याद्वारे ते माणसाला भूतकाळातील त्रस्त करणाऱ्या, जगणं असह्य़ करणाऱ्या आठवणी नष्ट करून त्याला नव्यानं चांगलं आयुष्य जगण्याची संधी देऊ करतं. आपल्या बायकोनं डॉ. नवरंगेंच्या मदतीनं असंच काहीतरी केलं असणार असा त्याला संशय असतो. खरं तर बायको घर सोडून गेली याचा त्याला आनंदच झालेला असतो. कारण सततच्या भांडणांनी आणि उठसूट तिच्याकडून होणाऱ्या अपमानानं तो ज्याम वैतागलेला असतो. त्यामुळे नस्ती ब्याद गेली असंच त्याला वाटत असतं. फक्त ती कुठं गेलीय, एवढंच त्याला जाणून घ्यायचं असतं. त्याचा कयास खरा ठरतो. डॉ. नवरंगे श्यामलाही मागील आठवणी पुसून नवं आयुष्य जगण्याची संधी देऊ करतात. त्याला तर ते हवंच असतं. मात्र त्यासाठी त्याला त्या विशिष्ट यंत्रात जाऊन मेघाशी संबंधित जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यावा लागणार असतो. भविष्यातील सुंदर आयुष्याच्या कल्पनेनंच श्याम इतका हरखतो, की त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो. आणि.. आठवणींच्या फ्लॅशबॅकमध्ये त्याच्या आणि मेघामधील बेबनावाचे एकेक प्रसंग उलगडत जातात. भ्रमर वृत्तीचा टिपिकल पुरुष असलेल्या श्यामच्या एकेका करतुतीनं मेघाचा त्याच्याबद्दलचा भ्रम वितळत जातो. उभयतांत वादविवाद आणि भांडणांना ऊत येतो. दरवेळी श्याम झाल्या गोष्टीबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचं सांगून तिची माफी मागतो आणि याउप्पर तिचा गुलाम होऊन राहण्याचं कबूल करतो. तीही मग त्याला गुलामासारखाच वागवते. अर्थात मेघासुद्धा स्त्रीमुक्तीच्या अतिरेकी कल्पनांनी पछाडलेली असल्यानं तिचंही वर्तन धड नसतंच. त्यातून त्यांच्यात ठिणग्या उडू लागतात. सततच्या भांडणांनी त्यांच्यातले भावनिक बंधही करपून जातात. परस्परांपासून सुटकेच्या संधी दोघंही शोधू लागतात. या सगळ्याचा व्हायचा तोच शेवट होतो. मेघा घर सोडून निघून जाते. भूतकाळातील या क्लेशदायी क्षणांना पुन्हा उजाळा देताना श्यामचं मन हेलकावे घेतं. विशेषत: मेघासोबतच्या चांगल्या आठवणींच्या वेळी! असं घडता कामा नये याची कल्पना श्यामला डॉक्टरांनी आधीच दिलेली असते. तसं काही घडल्यास त्याच्यावरचा प्रयोग अयशस्वी होऊन तो कोमात जाण्याचा धोका असतो. परंतु एका भावुक क्षणी श्यामचा स्वत:वर ताबा न राहिल्यानं गडबड होतेच. आणि त्याचा त्रासदायक भूतकाळ त्याच्या स्मृतिपटलावरून पुसून टाकण्याच्या प्रक्रियेत खंड पडतो. तो कोमात जातो. आणि प्रयोग फसतो.. पुढं काय होतं, हे नाटकातच पाहणं योग्य.
निखिल रत्नपारखी यांनी नवरा-बायकोच्या नात्यातले कळीचे मुद्दे यात खुबीनं हेरले आहेत. अर्थात त्यात नवं काहीच नाहीए. नवी आहे ती त्यांची खुमासदार, चटकदार मांडणी! त्यांनी सायन्स फिक्शनसारखी या नाटकाची हाताळणी केली असती तर काही आगळं त्यांच्या हाती गवसलं असतं. परंतु त्यांनी त्या वाटेनं जायचं नाकारलं आहे. यात योजलेली वैज्ञानिक संकल्पनाही त्यांनी नीटशी अधोरेखित केलेली नाही. त्याऐवजी रंजनाच्या पातळीवरच नाटक अधिक खेळत राहतं. त्यांचा हा निर्णयही बहुधा जाणीवपूर्वकच असावा असं वाटतं. असो. त्यांनी त्यांना अपेक्षित फार्सिकल कॉमेडी धम्माल पेश केली आहे. त्यासाठी संहितेपासून सादरीकरणापर्यंत त्यांनी अनेक मोक्याच्या जागा हुशारीनं शोधून काढल्या आहेत. यातील प्रसंग व घटना सर्वपरिचित असल्या तरीही हास्यस्फोटक संवाद, क्रिया-प्रतिक्रिया- प्रतिक्षिप्त क्रियांचा अतिशय सुंदर वापर करत त्यांनी नाटक सतत गतिमान राहील याची दक्षता घेतली आहे. एकीकडे नकोशा आठवणी पुसणाऱ्या यंत्राची संकल्पना आणि दुसरीकडे प्रत्यक्ष त्या घटनांचं मंचन यांचा तोल व ताळमेळ त्यांनी उत्तमरीत्या साधला आहे. त्याद्वारे प्रेक्षकांचं पैसावसूल मनोरंजन करण्याचा त्यांचा हेतू दोनशे टक्के साध्य झाला आहे. त्याकरता प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य त्यांना साहाय्यभूत ठरलं आहे. गंधार संगोराम यांनी योजलेलं पाश्र्वसंगीतही आपली भूमिका चोख बजावतं. शीतल तळपदेंच्या प्रकाशयोजनेत मात्र तांत्रिक सफाईचा अभाव जाणवतो.  
निखिल रत्नपारखी हे जात्याच एक बुद्धिमान नट (आणि लेखक-दिग्दर्शकसुद्धा!) असल्यानं, तसंच विनोदाची त्यांची अफलातून जाण असल्यानं श्यामच्या भूमिकेला त्यांनी चार चॉंद लावावेत यात नवल ते काय! फार्सिकल कॉमेडी हा तर त्यांच्या हातचा मळ. त्यामुळे ते अक्षरश: सहजत्स्फूर्त बागडले आहेत. बायकोच्या अपरोक्ष मित्रांसमवेत दारूकाम करताना पकडले गेल्यावर अपराधीपणाच्या भावनेतून बिच्चारेपणाचा जो आव त्यांनी आणला आहे, तो अफलातूनच. बायकोचा वाढदिवस विसरलेल्या श्यामला कर्मधर्मसंयोगानं तो ज्या टॅक्सीतून जात असतो, त्यात कुणीतरी विसरून गेलेलं घडय़ाळ सापडतं. आणि तेच घडय़ाळ तो बायकोला प्रेझेन्ट देतो. त्यामुळे आपण थोडक्यात बचावल्याच्या आनंदात असलेला श्याम.. नंतर मित्राच्या हरवलेल्या घडय़ाळाची कथा आपल्याला मिळालेल्या घडय़ाळाशी तंतोतंत जुळत असल्याचं लक्षात आल्यावर त्याची जी काही हबेलंडी उडते, ती ‘न भूतो न भविष्यति’ अशीच! भक्ती रत्नपारखी यांनी उटपटांग, आगाऊ, फटाकडी मेघा यथार्थ साकारली आहे. त्यामुळे नाटकातील संघर्षांला चांगलीच धार येते.
संकर्षण कऱ्हाडे यांनी डॉ. ननावरे, मेघाचा बायकी मित्र त्याचप्रमाणे श्यामचा नको तेव्हा नको ते पचकणारा मित्र मोन्या अशा त्रिविध भूमिकांचं बेअरिंग उत्तमरीत्या वठवलं आहे. तुषार गवारे यांनीही दारूकामाच्या प्रवेशात प्रचंड धम्माल केली आहे. लतिका सावंत यांनी मेघाची अतिरेकी स्त्रीमुक्तीवादी वकील मैत्रीण शालिनीचं कर्कश्श रूप छान रंगवलं आहे.  एकूण, ताज्यातवान्या विनोदाचं शत-प्रतिशत करमणूक करणारं नाटक असंच ‘बेगम मेमरी..’चं वर्णन करता येईल.                                                 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा