भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात येणा-या चित्रपट निवड समितीमध्ये आपली निवड झाली, हा आपला सर्वोच्च बहुमान असून, त्यामुळे देशातील विविध प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आपल्याला पाहाता येतील, असे मत अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक विजय पाटकर याने व्यक्त केले.
विजय पाटकर पुढे म्हणाला, नवी दिल्लीतील फिल्म फेडरेशनच्यावतीने या समितीमध्ये दहा जणांची निवड होते. मला या संदर्भात विचारण्यात आले, तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला. हा माझ्या कारकीर्दीचा सर्वात आनंददायक क्षण आहे, असे मला वाटते. १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत नवी दिल्ली येथे यासाठीच्या चित्रपटांचे खेळ होतील. मराठी व हिंदी या भाषांसह तमीळ, तेलगू, बंगाली इत्यादी भाषांतील यावर्षीचे उत्तोमोत्तम चित्रपट पाहायला मिळतील व त्यामुळे आपला चित्रपट पाहण्याचा खजाना वाढेल, असेही विजय पाटकरने सांगितले. यात कोणते चित्रपट असतील हे लवकरच स्पष्ट होईल, असेही तो म्हणाला.

Story img Loader