तमिळ सुपरस्टार व रजनिकांतचा जावई धनुष म्हणतो, सुप्रसिध्द अभिनेत्याचा जावई असण्याचा त्याला काही फायदा झालेला नाही व त्याचा कोणता परिणामही झाला नाही.
धनुष व सुपरस्टार रजनिकांतची कन्या ऐश्वर्या यांचा २००४ मध्ये विवाह झाला आहे.
“खरेपाहता रजनिकांत यांचा जावई असण्याचा मला काही फायदा झालेला नाही. मी माझे काम करत आलो आहे. त्यांच्या(रजनिकांत) नावाची मला मदतही झाली नाही व माझ्यावर त्या गोष्टीचा काही परिणाम देखील झाला नाही,” असे मुंबईमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धनुष म्हणाला.
माझे सासरे आणि माझ्या अभिनयाची कोणत्याही प्रकारे तुलना करता येणार नाही. त्यांची काम करण्याची शैली व माझी पध्दत यांमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचे धनुष म्हणतो.
“माझी चित्रपटांची निवड वेगळी आहे. माझ्या अभिनय शैलीमध्ये व त्यांच्या शैलीमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे दोघांमधील तुलनेला काहीच वाव नाही. आतापर्यंत फक्त २०-२५ सिनेमे केलेल्या माझ्यासारख्या सामान्य अभिनेत्याची रजनिकांत यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न अभिनेत्याशी तुलना करणेच मुळी निरर्थक बडबड आहे,” असं धनुष या मुलाखतीमध्ये म्हणाला.
धनुष ‘रांझना’ द्वारे बॉलिवूडमध्ये आगमन करत असून, त्याने या चित्रपटा विषयी रजनिकांत सोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. “खरे सांगायचे म्हणजे रजनिकांत त्यावेळी त्यांच्या व मी माझ्या कामात व्यस्त होतो. आम्ही अद्याप या चित्रपटाविषयी चर्चा केलेली नाही,” असं धनुष म्हणाला.
पत्नी ऐश्वर्याची त्याच्या बॉलिवूडच्या आगमना विषयी काय प्रतिक्रिया होती विचारले असता, धनुष म्हणाला,”तिने हा चित्रपट पाहिलेला नाही. मात्र, मला हिंदी बोलता यायला लागल्याचा ऐश्वर्याला आनंद झाला आहे.”
धनुष ‘रांझना’मध्ये सोनम कपूर बरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात अभय देओल, स्वरा भास्कर आणि सुरज सिंह त्याचे सहकलाकार आहेत.

Story img Loader