चित्रपट, मालिका, फेसबुक, ट्विटर, सॉफ्टवेअर, वेबसाइट्स यांसारखी महत्त्वाची माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली लाखो माध्यमे आज इंटरनेटवर कार्यरत आहेत. परंतु ही सर्वच माध्यमे आज ब्लॅक हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ब्लॅक हॅकर्स म्हणजे असे लोक जे केवळ पैसे मिळवण्याच्या हेतूने इंटरनेटवरून माहितीची चोरी करतात. मोठमोठय़ा सुरक्षा यंत्रणा भेदण्यात निपुण असलेल्या या अट्टल गुन्हेगारांनी अनेक नामवंतांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे. अगदी काल परवा  अय्यिलदिज नामक एका टर्कीश हॅकर ग्रुपने अभिनेता अमिताभ बच्चन व गायक अदनान सामी यांचीही ट्विटर अकाऊं ट्स हॅक करून त्यावर देशविघातक संदेश दिले होते. असाच काहीसा प्रकार अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्नच्या बाबतीतही घडला आहे.

बेला थॉर्नचे ट्विटर व इंस्टाग्राम अकाऊं ट एका अज्ञात ब्लॅक हॅकर ग्रुपने हॅक केले होते. त्यावरून तिचे नग्न फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली. दुसरा तिसरा कोणी असता तर या धमक्यांनी पार गर्भगळीत झाला असता, परंतु आपल्या बिनधास्त प्रवृत्तीसाठी लोकप्रिय असलेल्या बेलाने चक्क स्वत:हूनच आपले नग्न फोटो इंटरनेटवर अपलोड करून ब्लॅकमेल करणाऱ्या गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावले आहेत. १५ जूनला तिने आपले फोटो अपलोड केले व त्याबाबत ट्विट करून यापुढे ‘मला धमकावण्याचा पोकळ प्रयत्न करू नका’, असा संदेश ब्लॅकमेल करणाऱ्या हॅकर्सना दिला.

‘तब्बल २४ तासांसाठी माझे अकाऊं ट हॅक करण्यात आले होते. त्यांनी बहुधा माझ्या मोबाइल फोनमार्फत हॅकिंग केले असावे. कारण मोबाइलमध्ये पासवर्ड टाकून सेव्ह केलेले माझेच न्यूड फोटो मला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. त्या हॅकरने माझ्याव्यतिरिक्त इतर काही नामवंत सेलिब्रिटींचेही फोटो मला पाठवले होते. या अनपेक्षित प्रकारामुळे मी घाबरले होते. अनेक दिवस मी त्यांच्या या धमक्या सहन केल्या, परंतु शेवटी मी एक निर्णय घेतला. आणि मीच माझे नग्न फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध केले, कारण तो मलाच ब्लॅकमेल करून थांबणार नाही तर तो यापुढे अशा अनेकांना ब्लॅकमेल करेल, हे मला कळून चुकले होते. आणि सर्व प्रकार थांबवण्यासाठी मी स्वत:च माझा बळी दिला. आता त्याला माझ्याकडून काहीच मिळणार नाही. आता मी निवांत झोपू शकेन’, असे ट्विट करून बेलाने त्या हॅकर्सला चोख प्रत्युत्तर दिले.

बेला थॉर्नने दाखवलेल्या या हिमतीचे समाजातील सर्वच स्तरांतून कौतुक होते आहे. बेलाने केलेल्या या ट्विटला ३२ हजारांहून अधिक लोकांनी रिट्वीट करून तिचे मनोबल वाढवले आहे. दरम्यान अमेरिकन पोलिसांवरही टीका केली जाते आहे. त्यामुळे सायबर पोलीस सध्या या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत आणि लवकात लवकर ते या गुन्हेगारांना गजाआड करतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

Story img Loader