सुपरहिरोपटांमध्ये ‘बॅटमॅन’ अवतारात झळकणाऱ्या बेन अफ्लेक याने डीसी युनिव्हर्समधून निवृत्ती घेतली आहे. बेनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपण यापुढे बॅटमॅनची व्यक्तिरेखा साकारणार नसल्याची घोषणा केली.
ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘बॅटमॅन द डार्क नाईट’ ही चित्रपट मालिका तुफान गाजली होती. ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या या मालिकेला सुपरहिरो क्षेत्रातील मैलाचा दगड म्हटले जाते. त्यामुळे ‘द डार्क नाईट’ मालिकेने मिळवलेले घवघवीत यश पाहता डीसी कंपनीनेदेखील माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सप्रमाणेच एक सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ही कामगिरी ख्रिस्तोफर नोलान यांच्यावर सोपवण्यात आली होती, परंतु निर्मात्यांबरोबर झालेल्या काही अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी हा प्रकल्प सोडून दिला. याआधी अभिनेता ख्रिश्चन बेलने बॅटमॅनची व्यक्तिरेखा साकारली होती, परंतु त्यानेही काही वैयक्तिक कारणांमुळे यापुढे काम करण्यास साफ नकार दिला. यावर उपाय म्हणून २०१६ साली अभिनेता बेन अफ्लेकची बॅटमॅन म्हणून आगामी चित्रपटांसाठी निवड केली गेली.
आजवर तब्बल तीन वेळा ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरणारा बेन अफ्लेक एक नावाजलेला कलाकार आहे. मात्र बॅटमॅन अवतारात तो सपशेल अपयशी ठरला. प्रेक्षकांनी सातत्याने त्याच्यावर टीका केली. त्याने भूमिका केलेले ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ व ‘जस्टिस लीग’ हे दोन्ही चित्रपट तिकिटबारीवर जोरदार आपटले. परिणामी चित्रपटांच्या अपयशाचे खापर बेनवर फोडले गेले. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या अपमानाला वैतागून अवघ्या दोन चित्रपटांनंतरच त्याने बॅटमॅन अवतारातून कायमची निवृत्ती घेतली आहे.
बॅटमॅन हा डीसीचा सर्वात यशस्वी सुपरहिरो आहे. त्यामुळे नेहमीच त्याची तुलना माव्र्हलचा सर्वात यशस्वी सुपरहिरो आयर्नमॅनशी केली जाते, परंतु ‘द डार्क नाईट’ ही मालिका वगळता बॅटमॅन सुपरहिरोपटांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत आयर्नमॅनच्या तुलनेने बॅटमॅनच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने खाली घसरतो आहे. सातत्याने होणारी ही पडझड थांबवण्यासाठी निर्मात्यांनी पुन्हा एकदा एका नवीन कलाकाराचा शोध सुरू केला आहे. हा अभिनेता बेन अफ्लेकपेक्षा जास्त तरुण व तडफदार असेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी बॅटमॅन दिग्दर्शित करावा, यासाठीही निर्मात्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.