प्रसिद्ध बंगाली अभिनत्री श्रीला मुजुमदारचं निधन झालं आहे. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर कर्करोगासंदर्भात उपचार सुरू होते, याच दरम्यान शनिवारी (२७ जानेवारी रोजी) त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीला या समांतर व मुख्य प्रवाहातील सिनेमे या दोन्हीमधील त्यांच्या कामासाठी ओळखल्या जायच्या.
अभिनेत्रीच्या पश्चात त्यांचे पती एस.एन.एम. अब्दी आणि मुलगा सोहेल अब्दी आहेत. श्रीला यांच्या पतीने आयएएनएसला सांगितलं की, त्या गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला.
Bigg Boss 17 ची ट्रॉफी जिंकल्यावर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट, डोंगरीचा उल्लेख करत म्हणाला…
श्रीला यांनी वयाच्या १६ व्या वर्षी १९८० मध्ये ‘परशुराम’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि दिवंगत स्मिता पाटील यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘अकालेर संधाने’ मधील दुग्गा, ‘एकदिन प्रतिदिन’मध्ये मिनू. ‘खारिज’मध्ये श्रीजा अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुजुमदार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. “अभिनेत्री श्रीला मजुमदार यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झाले आहे. श्रीला एक प्रसिद्ध आणि शक्तिशाली अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भारतीय चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या. त्यांचं जाणं हे बंगालमधील फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठं नुकसान आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.