कोल्हापूरच्या सतीश लोखंडे पाटलांचा भव्य वाडा. सतीश, त्याची बायको मधुरा आणि माई (आई) कुणाच्या तरी येण्याची आतुरतेनं वाट पाहताहेत. येणाऱ्या व्यक्तीसाठी क्रिकेटचं साहित्य, जुना फोटो अल्बम वगैरे जय्यत तयारी केली गेलीय. इतक्यात खाली कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. सतीश घाईघाईत खाली जातो. मधुरा, माई बेचैन. इतक्यात एक तरुणी तिथं प्रवेशते.. डॉ. समिधा! ती त्या दोघींना सांगते की, ‘श्री तुमच्याकडे महिनाभर राहील. तो तुमचा समीर आहे की नाही, हे यादरम्यान कळून यावं अशी अपेक्षा आहे. परंतु तोवर तुम्ही त्याला त्याच्या (आताच्या) ‘श्री’ या नावानंच संबोधायचं. आठ वर्षांपूर्वी अपघातात श्रीची मागची स्मृती पार पुसली गेलीय. निराधार श्रीला माझ्या वडिलांनी हॉस्पिटलमधून आमच्या घरी आणलं. तिथून त्याचं आयुष्य नव्यानं सुरू झालं. आता तो त्यातून बरा झाला असला तरी त्याला आठ वर्षांमागचं काहीच आठवत नाही. आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तुमच्या समीरसारखा तो दिसतो, त्यामुळे श्री हा पूर्वाश्रमीचा समीरच असणार असं तुमचं म्हणणं आहे. असाच दावा मुंबईच्या श्री. गिरमे यांनीही केलाय. त्यांचाही बेपत्ता मुलगा तंतोतंत श्रीसारखाच दिसत होता. श्रीलासुद्धा आपला भूतकाळ जाणून घ्यायचाय. त्याच्याच आग्रहावरून मी हा सारा खटाटोप करते आहे. तुम्हा दोन कुटुंबांच्या त्याच्यावरील दाव्यानुसार श्री प्रथम महिनाभर तुमच्याकडे आणि नंतर महिनाभर गिरमे यांच्याकडे राहणार आहे. या वास्तव्यात भोवतालच्या माणसांमुळे, वातावरणामुळे त्याची गेलेली स्मृती पुनश्च जागृत झाली आणि त्याला आपला भूतकाळ आठवला तर चांगलंच आहे. तो त्याच्या माणसांत परत येईल. परंतु तोपर्यंत कृपया तुम्ही त्याच्यावर तो समीरच असल्याचं थोपवू नये. तो समीर आहे की नाही, हे अद्याप ठरायचंय. तो तुमचा समीर निघाला तर मला आनंदच आहे. पण त्यानं समीर असल्याचं मान्य करण्यासाठी तुम्ही त्याच्यावर जोरजबरदस्ती करू नये. तसं झाल्यास मी त्याला त्याक्षणी इथून घेऊन निघून जाईन.’
इतक्यात कुत्र्याच्या भुंकण्यानं भेदरलेल्या श्रीला घेऊन सतीश येतो. ‘आपण आपल्या घरी जाऊयात. मला इथं बिलकूल राहायचं नाही..’ असं म्हणत श्री समिधाला ताबडतोब निघायला सांगतो. परंतु सतीशला मात्र आश्चर्य वाटतं, की समीर आपल्या लाडक्या कुत्र्याला कधीपासून घाबरायला लागला? तो तसं बोलूनही दाखवतो. तेव्हा समिधा त्याला वास्तवाची जाणीव करून देते- ‘श्री हा तुमचा समीर आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचंय. त्याच्यावर ‘समीर’ला लादू नका. श्रीला तुमच्या कुत्र्याची भयंकर भीती वाटतेय. त्याला त्याच्यापासून दूर ठेवा.’ घाबरलेल्या श्रीला शांत करून ती हळुवारपणे त्याची समजूत काढते.
श्रीला तिथली कुठलीही गोष्ट ओळखीची वाटत नाही. आपण एका परक्या घरात आलोय असंच त्याला वाटतं. पण ठरल्यानुसार महिनाभर तिथं राहणं भाग असतं. सतीश त्याला कोल्हापुरातल्या अनेक ठिकाणी आपल्यासोबत घेऊन जातो. त्या ठिकाणांच्या दर्शनाने त्याची स्मृती जागी होईल असं त्याला वाटतं. पण तसं काही होत नाही. उलट, एक नस्तीच समस्या उद्भवते. समीरचा मित्र नंदन याचा भाऊ दिलीप चव्हाण हा श्रीला पाहून पिसाटतो. समीरने केलेल्या बेदम मारहाणीमुळेच नंदन पक्षाघात होऊन अंथरुणाला खिळला असं दिलीपचं म्हणणं असतं. त्यामुळे समीरचा सूड घेण्यासाठी तो टपलेला आहे. तंतोतंत समीरसारख्या दिसणाऱ्या श्रीला पाहताच त्याचं रक्त पेटतं. तो त्याचा खून करण्याची धमकी देतो. त्याच्या त्या धमकीनं श्री हादरतो. श्रीमंतीच्या माजापायी गुंड समीरने घातलेला धुमाकूळ, बळजोरीनं गावातल्या बायका-मुलींना नासवण्याचे केलेले उद्योग, त्याची व्यसनं वगैरे गोष्टी एव्हाना श्रीच्या कानावर आलेल्या असतातच. त्या ऐकल्यावर आपण समीर असणंच शक्य नाही याबद्दल त्याची खात्रीच पटते. पण इकडे सतीश, माई आणि मधुराची तो समीरच असल्याचं सिद्ध करण्याकरता आटापिटा सुरू असतो. मधुरा तर समीरबरोबरच्या आपल्या गाढ प्रणयी आठवणींना उजाळा देत, ‘तुझ्याशिवाय मी गेली आठ वर्षे कशी काढली, हे माझं मलाच माहीत..’ असं त्याला व्याकुळ होऊन म्हणते. आपण समीर असल्याचं त्यानं कबूल केलं नाही तर स्वत:वर गोळ्या झाडून घेण्याची धमकी देते. आपल्या जिवाचं ती बरंवाईट करेल या भीतीनं श्री आपण समीर असल्याचं नाइलाजानं कबूल करतो.
या सगळ्या घटनांनी श्रीचं डोकं पार भिणभिणतं. सतीशची बायको असलेली मधुरा स्वत:च आपले आपल्या दिराशी- समीरशी प्रेमसंबंध असल्याचं आक्रमक होत सांगते, याचा अर्थच त्याला लागत नाही. हे सारंच भयंकर आहे. एकीकडे दिलीप चव्हाणनं दिलेली जीवे मारण्याची धमकी आणि दुसरीकडे मधुराचं हे गळ्यात पडणं.. आता जर आपण इथून निघून गेलो नाही तर आपल्याला वेड लागेल असं श्रीला वाटतं.
..पुढे काय होतं? तो खरोखरच समीर असतो का? मधुराबरोबर त्याचे संबंध असतात का? आणि सतीशला याची काहीच कल्पना नसावी?.. या आणि अशा अनेकानेक प्रश्नांचे भुंगे प्रेक्षकांना पोखरत राहतात. नाटकाच्या अखेरीस त्यापैकी काहींची उत्तरं मिळतातही; परंतु त्यासाठी अर्थातच नाटक बघणं आवश्यक आहे.
लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांचं ‘बेचकी’ हे (बहुधा) पहिलंच नाटक. सस्पेन्स थ्रिलर लिहिणं खचितच सोपं नाही. रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं, वर त्यातली गुंतागुंत वाढवत न्यायची आणि अखेरीस त्या सगळ्या गुंत्यांची प्रेक्षकांना पटेल अशी सोडवणूक करायची, हे येरागबाळ्याचं काम नोहे. चिन्मय मांडलेकर त्यात बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत. विशेषत: यातल्या माणसांचे परस्परसंबंध इतके गुंतागुंतीचे आणि अतक्र्य आहेत, की त्यातून नाटक सहीसलामत बाहेर येणं मुश्कीलच. खिळवून ठेवणारं कथानक आणि त्यातली नाटय़पूर्ण वाकणंवळणं यांचा विलक्षण ताण मांडलेकरांनी नाटकात लीलया निर्माण केला आहे. विशेषत: समीर आणि मधुरा यांच्यातलं नातं आणि त्यातून निर्माण झालेला नातेसंबंधांचा पेच सुन्न करणारा आहे. त्यामुळे नाटकाचा शेवट काय होणार, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जाते. आठ वर्षांनी सापडलेला समीर पुन्हा आपल्यापासून कायमचा दूर जाणार, या भीतीनं आपली आणि आपल्या कुटुंबाच्या अब्रूची पर्वा न करता मधुरा समीरबरोबरचे आपले संबंध नवऱ्याकडे जाहीरपणे कबूल करते. त्या क्षणी नाटक उत्कर्षबिंदूप्रत जातं. आणि आता या गुंत्यातून मांडलेकर कशी काय वाट काढणार, याचा ताण प्रेक्षकांवरही येतो. पण नाटकाचा संदिग्ध शेवट करून मांडलेकरांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाऱ्यावर सोडून दिली आहे. कदाचित त्यांना त्यातून पुढचं नाटक खुणावत असावं. कुणास ठाऊक! लेखक-दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिका वठवताना चिन्मय मांडलेकर यांना आपल्या नाटकातील काही दोष आकळलेले नाहीत.
नाटकाच्या प्रारंभीचा प्रस्तावनावजा प्रवेश नको इतका लांबतो. त्यातली समिधाची बडबड असह्य़ होते. पात्रांना आपल्या भूमिका सापडायला त्यामुळे अकारण विलंब लागलाय. परिणामी प्रयोगही उशिरा पकड घेतो. पण एकदा पकड घेतल्यावर मात्र नाटक प्रेक्षकांना बिलकूल जागेवरून हलू देत नाही.
हाच आक्षेप नाटकाच्या शेवटाबद्दलही! अखेरीस समीरच्या भूतकाळातील करणीची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन तो झाल्या गोष्टी निस्तरायचं ठरवतो. पण त्या निस्तरणं वास्तवात शक्य आहे का? भूतकाळाला न्याय देऊ जाता वर्तमानातल्या समिधावर अन्याय होणार. आणि वर्तमानाशी प्रामाणिक राहावं, तर मधुराचं भविष्य अंधारमय होणार. काय, करणार काय? म्हणूनच बहुधा उत्तरांच्या शक्यतेपाशी नाटक संपवून मांडलेकर मोकळे झालेले आहेत.
पात्रांचे मनोव्यापारही जितक्या तपशिलांत यायला हवे होते, तितके नाटकात आलेले दिसत नाहीत. त्यामुळे ‘श्री’चं रहस्य कायम राहिलं, तरी त्याचा स्वत:शीच चाललेला संघर्ष मात्र अधोरेखित होत नाही. मधुरा या व्यक्तिरेखेचा प्रवास मात्र निश्चित दिशेनं होतो. सतीशची दुखरी नसही कुठंतरी सूचकतेनं यायला हवी होती. समिधालासुद्धा श्रीमध्ये होणाऱ्या बदलांपासून दूरच ठेवलंय. समीरचं पूर्वायुष्य पाहता त्याच्याबद्दल माईंना इतकं ममत्व का वाटावं, हा प्रश्न नक्कीच सतावत राहतो.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी कोल्हापूरकर लोखंडे-पाटलांचा प्रशस्त वाडा त्याच्या भवतालासह उभा केला आहे. समीरच्या खोलीतलं मैथुन पेंटिंग त्याच्या व्यक्तित्वाचं सूचक निदर्शक आहे. प्रकाशयोजनेतूनही मुळ्ये यांनी नाटय़ांतर्गत ताण चढत्या श्रेणीनं अधिक ठाशीव केलेला आहे. घटना-प्रसंगांतले विविध मूड्स राहुल रानडे यांनी पाश्र्वसंगीतातून सघन, गहिरे केले आहेत. लतिका गोरे यांनी वेशभूषेतून पात्रांचा सामाजिक स्तर आणि व्यक्तिमत्त्वातला पीळ सुस्पष्ट केला आहे.
या नाटकात पहिल्या प्रवेशापासूनच भूमिकेचा सूर सापडलाय तो मधुरा झालेल्या नेहा जोशी यांना! त्यांच्या नि:शब्द हालचाली, संभ्रमित वावर खूप काही सांगून जातो. समीर आपल्यापासून पुनश्च आणि कायमचा दुरावणार, या आशंकेनं तिची होणारी प्रचंड तगमग, तडफड आणि त्यातून एका भावप्रक्षोभक क्षणी सभ्यतेचे सारे संकेत धुडकावून देत तिनं समीरवर स्वत:ला झोकून देणं, स्वत:ला संपवण्याची धमकी देत त्याच्याकडून आपणच समीर असल्याचं वदवून घेणं.. हे सारं प्रेक्षकांना अक्षरश: सुन्न.. स्तंभित करतं. प्रसाद ओक यांनी आपल्या पूर्वायुष्याबद्दल अनभिज्ञ असतानाचा मोकळाढाकळा श्री आणि पूर्वायुष्याची जळमटं सर्वागानं वेढू लागल्यावर त्यांत घुसमटणारा, भूतकाळाच्या कोंडीत सापडून भेलकांडणारा, तो भूतकाळ जिवाच्या आकांतानं नाकारू पाहणारा समीर उत्कटतेनं साकारला आहे. त्यांना संहितेचं भरभक्कम पाठबळ मिळतं तर ही व्यक्तिरेखा आणखीन सखोल झाली असती. पूर्वा पवार यांची समिधा डोळ्यांतून मूकपणे खूप काही बोलते. पण समिधा या पात्राला एकंदर नाटकात जे स्थान असायला हवं होतं ते लाभलेलं नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
प्रारंभी संयत, सौम्य वाटणारा आणि आपलं खानदानीपण जपणारा थोरला भाऊ सतीश हा सूडाच्या भावनेनं पेटल्यावर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं हिंस्र दर्शन विघ्नेश जोशी यांनी आपल्या वागण्या-वावरण्यातून आणि संवादोच्चारांतील फरकातून ठाशीवपणे घडवलं आहे. हृदयनाथ राणे यांचा मस्तवाल (?) दिलीप चव्हाण केवळ तोंडपाटीलकी करणारा आहे असंच सतत वाटतं. त्यांची देहबोलीही त्यांच्या धमकीला साथ देत नाही. सागर निंबाळकर (पिऱ्या) आणि स्वरूपा खोपकर (माई) यांनी आपली कामं चोख केली आहेत.
‘बेचकी’ खिळवणारे रहस्यरंजन
कोल्हापूरच्या सतीश लोखंडे पाटलांचा भव्य वाडा. सतीश, त्याची बायको मधुरा आणि माई (आई) कुणाच्या तरी येण्याची आतुरतेनं वाट पाहताहेत. येणाऱ्या व्यक्तीसाठी क्रिकेटचं साहित्य, जुना फोटो अल्बम वगैरे जय्यत तयारी केली गेलीय. इतक्यात खाली कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो.
First published on: 20-01-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beshki suspense entertainment play