हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्रींची एकमेकींशी मैत्री कधीच होऊ शकत नाही, असं पैजा लावून सांगितलं जायचं. अगदी दोन अभिनेत्री कुठल्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्याच तर त्यांच्या भूमिकांपेक्षाही हिने तिला कसं टाळलं आणि ती हिला कशी पाण्यात बघते किंवा हिने तिचा हीरो कसा गटवला.. असेच किस्से सगळीकडे चर्चिले जायचे. मात्र, बॉलीवूडमध्ये आलेल्या नव्या अभिनेत्रींनी ‘दुश्मनी’चा तथाकथित इतिहास मागे टाकून ‘बीएफएफ’‘(बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर) चा नवा अध्याय आरंभला आहे.
अलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या नव्या ‘बीएफएफ’. अलिया भट्ट आणि परिणिती नव्या ‘बीएफएफ’. दीपिकाला सापडली हुमामध्ये नवी ‘बीएफएफ’.. अरे! बॉलीवूडमध्ये सध्या या ‘बीएफएफ’चं नवं पीक आलं आहे. आणि हा आयुष्यभराचा दोस्ताना सुचवणारा ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर’ (बीएफएफ) हा शब्द सध्या लोकप्रिय केला आहे तो बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी.
मैत्रीची ज्याचीत्याची व्याख्या निराळीच असते. दोन मनं कोणत्या कारणाने जुळतात, कशी एकत्र येतात आणि एकमेकांशी मैत्रीच्या धाग्यात कशी बांधली जातात, याची प्रत्येकाची गोष्ट मोठी विलक्षणच असते. केवळ अडीअडचणीत मदतीला येणारा तो मित्र अशी व्याख्या निदान बॉलीवूडमध्ये तरी राहिलेली नाही. किंबहुना, सहवासाने होणारी सहजमैत्री हा सध्याच्या बॉलीवूड कलाकारांचा स्थायीभाव झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि बॉलीवूडच्या सध्याच्या आघाडीच्या नायिकांनी तर या मैत्रीतही आघाडीच घेतली आहे. अगदी नवीन अभिनेत्रींच्या बाबतीतच बोलायचं झालं तर अलिया भट्ट आपल्या अवखळ स्वभावामुळे सगळ्यात जास्त लोकप्रियही आहे आणि सहज इतरांशी मैत्री करून घेणारी आहे. त्यामुळे सध्या अलियाची परिणिती, श्रद्धा कपूर यांच्यापासून ते अगदी दीपिका पदुकोण, सोनम कपूर यांच्याशीही घट्ट मैत्री झाली आहे.
परिणिती आणि अलियाने तर एकमेकींच्या संबंधांबद्दल जे बोललं जातं त्याचा थेट सामना करायचं ठरवलं आहे. कोणताही समारंभ असेल, पार्टी असेल एकत्र राहायचं आणि ते लोकांना दाखवायचंही असं त्यांनी पक्कं ठरवलं आहे. ‘सेल्फी’ काढण्याच्या त्यांच्या छंदामुळे त्यांचे हे मैत्रीपूर्ण प्रसंग आणि त्याची क्षणचित्रे इंडस्ट्रीतील लोकांपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वदूर पसरत आहेत. अलिया आणि परिणिती म्हणजे एक यशराज प्रॉडक्शनची तर दुसरी धर्मा प्रॉडक्शनची नायिका. त्यामुळे या दोघींचंही मैत्रीवालं वर्तुळ एकच आहे. त्यांच्या या वर्तुळात सध्या श्रद्धा कपूरही सामील झाली आहे. खरंतर, या तिघीही आत्ता यशस्वी आणि लोकप्रिय असल्याने त्यांच्यात मैत्री होणं शक्य नाही, असंच म्हटलं जात होतं. मात्र, श्रद्धाच्या म्हणण्यानुसार आत्ताच्या नवीन कलाकारांना टोळीने राहायला खूप आवडतं. ते पार्टीत एकत्र येतात, समारंभात एकत्र असतात, सोशल मीडियावरही दररोज एकमेकांचे चित्रपट किंवा नेहमीच्या दैनंदिन घटनांवर चर्चा करत असतात. त्यामुळे एखाद्या मोठय़ा कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे आम्ही एकत्र असतो, असं श्रद्धाने सांगितलं आहे. मग भांडणाचा प्रश्न उरतोच कुठे?
एकीकडे या अभिनेत्रींनी समवयस्कांचीही गट्टी जमवली आहे तर दुसरीकडे आघाडीच्या अभिनेत्रींनाही त्यांनी आपल्याशी जोडून घेतलं आहे. म्हणजे अर्जुन कपूरच्या पार्टीत अलियाची दीपिकाशी गाठ पडली. त्या एकाच पार्टीत या दोघींचे सूर एवढे जुळले की तेव्हापासून त्या नेहमी एकत्र असतात. पण, मैत्रीचं नातं फुलण्यासाठी केवळ एकच हात पुढे येऊन चालत नाही ना. तो हात हातात घेऊन पुढे जाण्याइतकं मन मोठं असावं लागतं. आणि आश्चर्य वाटेल पण सध्या या नवीन कलाकारांचं मैतर सहजी स्वीकारत त्यांना विश्वासाने पुढे नेण्याचं काम दीपिका, प्रियांका आणि अगदी फटकळ म्हणून प्रसिद्ध असली तरी सोनम क पूरही करताना दिसते. प्रियांका चोप्रा या सगळ्या टोळीत फारच लोकप्रिय आहे. अलिया, श्रद्धा आणि इशा गुप्तासारख्या अभिनेत्रीनेही प्रियांका एक मैत्रीण म्हणून खूप वेगळी असल्याचं म्हटलं आहे. प्रियांकाची सध्या सोनाक्षी सिन्हाशी खास दोस्ती असल्याचं म्हटलं जातं. चित्रपटाच्या सेटवर मैत्री झालेल्यांमध्ये सोनम कपूर-जॅकलीन फर्नाडिस, इलियाना डिक्रुझ-नर्गिस फाखरी आणि तमन्ना भाटिया-ईशा गुप्ता या मैत्रिणींच्या जोडय़ा प्रसिद्ध आहेत.
मात्र, चित्रपटांशिवायही काही मैत्रीचे धागे असे घट्ट गुंफ ले जातात. करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींची मैत्री या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसं म्हटलं तर करिना आणि अमृता ‘गोलमाल २’ या एकाच चित्रपटात एकत्र आल्या होत्या. पण, फार कमी लोकांशी जमवून घेणाऱ्या करिनाला अमृताचा मोकळाढाकळा स्वभाव एवढा आवडला की तिने तिला कायमची मैत्रीण मानलं आहे. त्यांची मैत्री अजूनही टिकून आहे. दीपिका पदुकोण आणि शहाना गोस्वामी ही जोडीही अशीच अनोखी आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला दीपिका आणि शहानाने ‘ब्रेक के बाद’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
त्यानंतर दीपिकाची कारकीर्द कुठल्या कुठे पोहोचली. पण, आजही चित्रीकरणासाठी कुठेही असो. मुंबईत पाऊल टाकलं की दीपिकाला पहिल्यांदा हटकून आठवण येते ती शहानाची. तिच्याशी गप्पा मारल्याशिवाय दीपिकाला चैन पडत नाही. शहानानंतर दीपिका सध्या आणखी एका अभिनेत्रीशी जोडली गेली आहे ती म्हणजे हुमा कुरेशी. हुमाची मैत्री जमली ती दीपिकाची छोटी बहीण अनिशा पदुकोणशी. सोशल मीडियावरून त्या दोघी एकत्र आल्या. दीपिकाला हे कळल्यानंतर तिनेही हुमाला बहिणीबरोबरच्या आपल्या त्या खास वर्तुळात सामील करून घेतले आहे. बॉलीवूडची ‘ग्लॅमर गर्ल’ कतरिनाला तर मैत्रिणींपेक्षा शत्रूच जास्त आहेत. मात्र, तिची खास मैत्रीण आहे ती म्हणजे सलमान खानची बहीण अलविरा खान. सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर भलेही कतरिनाने त्याच्याशी कधी संवाद साधला नसेल. पण, अलविरा आणि तिची मैत्री आजही कायम आहे.
एकमेकींना सांभाळून घेत, नेहमी एकत्र राहून एकमेकींच्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यापासून ते कुणाच्याही बाबतीत चांगलं-वाईट घडलं तर तिच्याशी आपलं जुळत असेल-नसेल आपण तिच्याबरोबर असलं पाहिजे, याची पुरेपूर काळजी या सगळ्याजणी घेताना दिसत आहेत. आणि म्हणूनच तर दीपिकासारख्या अभिनेत्रीने एवढी भांडणे होऊनही कतरिनाला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याची संधी आवर्जून घेतली. उद्या रणबीरला बाजूला टाकून दीपिका आणि कतरिना बॉलीवूडच्या ‘बीएफएफ’ अशी बातमी आली तर नवल वाटणार नाही. इतक्या वेगाने बॉलीवूडच्या नायिकांमध्ये हा ‘बीएफएफ’ फंडा प्रभावीपणे असर करतो आहे.
बॉलीवूडच्या बीएफएफ
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन अभिनेत्रींची एकमेकींशी मैत्री कधीच होऊ शकत नाही, असं पैजा लावून सांगितलं जायचं.
First published on: 03-08-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best friends of bollywood