श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या प्रतिभावान लेखकापासून ते प्रशांत दामले, अविनाश नारकर, माधवी जुवेकर यांच्यासारख्या दर्जेदार कलाकारांपर्यंत सर्वामधील सामायिक गोष्ट म्हणजे हे सर्व ‘बेस्ट’ कर्मचारी आहेत. अशा एकापेक्षा एक प्रतिभावान कलाकारांचा भरणा असलेल्या ‘बेस्ट’मधील आणखी एका कलाकाराने कलेच्या आसमंतात झेप घेतली आहे. ‘बेस्ट’च्या ताडदेव येथील कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुरेश शेलार यांनी तयार केलेला ‘शुरुवात’ हा लघुपट मुंबई फिल्म फेस्टिवल अर्थात ‘मामी’च्या ‘सेलेब्रेट एज’ या वर्गवारीसाठी निवडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विभागात केवळ १३ लघुपटांची निवड झाली असून त्यातील फक्त ४ लघुपट भारतीय आहेत.
सुरेश शेलार यांनी याआधीही पाच लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शन हे माझे जीवनध्येय आहे. मात्र मला चित्रपट दिग्दर्शनासाठीचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मग मी एकलव्याप्रमाणे केतन मेहता, अनुराग कश्यप, सचिन कुंडलकर, मधुर भांडारकर या चौघांना गुरुस्थानी मानून ती विद्या शिकायला सुरुवात केली. मात्र माझ्यावर प्रभाव म्हणाल तर गुरूदत्त यांचा आहे, असे शेलार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
त्यांनी ‘मामी’साठी पाठवलेला ‘शुरुवात’ हा लघुपट १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट आणि २० वर्षांनंतर लागलेला त्या प्रकरणाचा निकाल या विषयावर आहे. बॉम्बस्फोटांमध्ये आपला मुलगा आणि पत्नी गमावलेला केशव नावाचा म्हातारा आणि त्याच्या घरात नुकताच राहायला आलेला राजीव हा तरुण मुलगा यांच्या नातेसंबंधांबद्दलही हा लघुपट भाष्य करतो. बॉम्बस्फोटांनंतरच्या २० वर्षांत बदललेली मुंबई, जगण्यातले बदललेले संबंध आणि २० वर्षांच्या मोठय़ा काळानंतर मिळालेला ‘न्याय’ या विषयाभोवती हा चित्रपट फिरतो, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
या लघुपटामध्ये बच्चन पचेरा आणि विकास पाटील या दोघांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा लघुपट तयार करण्यासाठी एक लाखाहून अधिक खर्च आला. मात्र प्रकाश बिरवाडकर आणि जगदीश होडगे या आपल्या मित्रांनी आपल्याला साहाय्य केल्यानेच हा लघुपट तयार होऊ शकला, असे शेलार यांनी सांगितले. त्याशिवाय वीणा जामकर, दिनेश आणि अश्विनी दुधवडकर आदींचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader