करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर त्याच्या जन्मापासूनच चर्चेत होता. करिना आणि सैफची लोकप्रियता, सेलिब्रिटी कुटुंब आणि कलाविश्वात या कुटुंबाच्या नावाभोवती असणारं वलय या सर्व गोष्टींमुळे तैमुरही बालपणात एक प्रकारे सेलिब्रिटी झाला. त्याचं नाव ठरल्यापासून ते अगदी पहिल्या वाढदिवसापर्यंत प्रत्येक गोष्टीला माध्यमांमध्येही बरंच महत्त्वं दिलं गेलं. अनेकजण तर त्याच्या निरागसपणाच्या प्रेमातच पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांमध्ये सुरु असणारं हे तैमुर प्रकरण मात्र काही नेटकऱ्यांना खटकतं. त्याच्याशी संबंधित काही फोटो आणि बातम्यांवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शेलक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्याचंही पाहायला मिळालं. ज्यामध्ये बऱ्याचदा खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर झाल्याचं पाहायला मिळालं. हे सर्व प्रकरण आणि नेटकऱ्यांचा अतिरेक पाहता आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टीवर आणि लहान मुलावर कोणी अशा प्रतिक्रिया कसं देऊ शकतं असं म्हणत कपूर आणि खान कुटुंबियांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय त्यांनी एक महत्त्वाचं पाऊलही उचललं आहे.

प्रसारमाध्यमांनी तैमुरशी संबंधित बातमी सैफ किंवा करीनाकडून मंजूर करून घ्यावी व त्यांनी अनुमती दिली तरच ती प्रकाशित करावी अशी अट घातली आहे. सैफच्या वकिलांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना नोटिसा पाठवल्या असून जर का या शर्तीचा भंग केला तर घटनेच्या २१ कलमानुसार वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात येईल असं बजावलं आहे. त्यामुळे तैमुरच्या बातम्या व फोटो खान कुटुंबियांची संमती न घेता अपलोड केले तर प्रसारमाध्यमांवर कारवाईचा बडगा उभारला जाऊ शकतो.

बऱ्याच दिवसांपासून आपण या गोष्टीचा विचार करत असून, अखेर त्यासंबंधीच्या निर्णयावर पोहोचलो आहोत. प्रकरण हाताळण्यापलीकडे गेल्याचं लक्षात येताच अखेर नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागल्याची प्रतिक्रिया तैमुरच्या कुटुंबियांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर तुम्हीही तैमुरच्या कोणत्याही बातमीवर, फोटोवर चुकीच्या पद्धतीची कमेंट पोस्ट केली असेल, तर कदाचित तुम्हीही अडचणीत येऊ शकता. तेव्हा सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी सर्वच बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, असंच म्हणावं लागेल.

 

(बातमी वाचून थक्कं झालात? सोशल मीडिया अकाऊंट पुन्हा पुन्हा रिफ्रेश करुन पाहिलंत? बरं… काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण वरील वृत्त हे एप्रिल फुल निमित्त रचण्याच आलं आहे.)

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beware while posting taimur ali khan photos april fool day special