ईशा अंबानी आणि आनंद पिरॅमल यांच्या प्री वेडिंग पार्टीसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. पण या सगळ्यात अमेरिकन पॉप सुपरस्टार बियॉन्सेनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. खास ईशा- आनंदच्या लग्नात लाइव्ह सादरीकरण करण्यासाठी क्वीन बियॉन्से अमेरिकेहून उद्यपूरला आली होती.
पाहुण्यांसाठी बियॉन्सेनं तिच्या गाजलेल्या गाण्यांचं सादरीकरण केलं होतं. तिच्या गाण्यांवर लग्नासाठी आलेले सारे पाहुणे थिरकले. विशेष म्हणजे शोसाठी ती ६० जणांची टीम घेऊन उद्यपूरमध्ये आली होती. यात पार्श्वगायक, डान्सर यांचा समावेश होता. बियॉन्सेनं तिची गाजलेली क्रेझी न लव्ह, परफेक्ट, सिंगल लेडिज यांसारखी गाणी गायली. सादरीकरण झाल्यानंतर बियॉन्से लगेचच अमेरिकेत परतली. बियॉन्से एका कार्यक्रमासाठी साधरण १० कोटींच्या आसपास मानधन घेते असं म्हटलं जातं.
या सोहळ्यासाठी बिसॉन्सेनं भारतीय डिझायनर अबु जनी संदीप खोसलानं डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. खास भारतीय पद्धतीची डिझाइन ठेवण्याचा आग्रह तिनं केला होता. या सोहळ्यासाठी हिलेरी क्लिंटन यांनी देखील उपस्थिती लावली होती. बियॉन्सेव्यतिरिक्त सलमान- शाहरुख, ऐश्वर्या- अभिषेक, प्रियांका, गौरी- शाहरूख, दीपिका-रणवीर सिंग यांनीही सादरीकरण केलं होतं.