मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री म्हणून प्रगल्भ अनुभव असलेल्या मृणाल कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला, तरी तिच्या दिग्दर्शनात सफाई आहे. तिच्या दिग्दर्शनात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. पहिल्याच चित्रपटात प्रेमासारख्या नाजूक नात्यावर भाष्य करण्याचा तिचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला आहे, असे म्हणावे लागेल..
२१व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच बदलाचे वारे जोराने वाहू लागले. या बदलाच्या वाऱ्यांनी जीवनालाही प्रचंड वेग दिला. वेगवान जीवनात नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था, ती सांभाळण्यासाठी करावी लागणारी भावनिक गुंतवणूक वगैरे सगळ्या गोष्टी मनात आणल्या तरी अशक्य होऊन बसल्या. जागतिकीकरणापासून सुरू झालेली ही प्रक्रिया गेल्या दहा-पंधरा वर्षांत जास्तच वेगवान झाली आणि मग इतर रक्ताच्या नात्यांबाबत न पडणारा पण पती-पत्नीच्या नात्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न जास्तच ठळकपणे जाणवू लागला.. ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं!?’
या महाकाय आणि सर्वव्यापी प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मृणाल कुलकर्णीने एक कथा लिहिली. त्या कथेतील पात्रांना प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्याचा अट्टहास केला आणि त्यातून साकारली चार पिढय़ांच्या प्रेमाची गोष्ट! ही गोष्ट बघताना मध्येच काही काळ रटाळ वाटू शकते, पण तरीही प्रत्येकाला त्यात त्याच्या आयुष्याशी जोडणारा दुवा नक्कीच सापडतो.
ही गोष्ट जशी अनुश्री (मृणाल कुलकर्णी), केदार (सुनील बर्वे), प्राची (पल्लवी जोशी) आणि डॉ. रोहित (सचिन खेडेकर) यांची आहे, तशीच ती अनुश्रीचे आईवडील (स्मिता तळवलकर आणि डॉ. मोहन आगाशे) यांचीही आहे. तेवढीच ती अनुश्रीच्या लहान बहिणीचीही (नेहा जोशी) आहे आणि अनुश्री-केदार व प्राची-रोहित यांच्या मुलांचीही आहे.
लग्नानंतर दोन लहान मुली अनुश्रीच्या पदरात टाकून केदारचे एका वेगळ्याच मुलीबरोबर प्रकरण सुरू आहे. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या त्याच्या आईने (सुहास जोशी) केदारला घराबाहेर काढले आहे आणि त्या सुनेमागे भक्कम उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला डॉ. रोहित आणि प्राची या दोघांचा घटस्फोट झाला आहे. प्राचीला अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी, शिक्षण मिळत असल्याने ती आपल्या दोन मुलांना रोहितच्या पदरात टाकून अमेरिकेत राहात आहे.
अनुश्री आणि रोहित या दोघांचीही मुले एकाच शाळेत शिकत आहेत आणि त्यामुळे एका कार्यक्रमादरम्यान अनुश्री आणि रोहित यांची भेट होते. पुढे योगायोगाने ते दोघे एकमेकांना भेटत जातात. मैत्री होते आणि पुढे हे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. अनुश्रीच्या या प्रकरणाचा पत्ता तिच्या बहिणीला लागतो. अतिशय प्रॅक्टिकल असलेली बहीण अनुश्रीला पाठिंबा देऊन थांबत नाही, तर अनुश्रीच्या सासूबाई आणि दोन मुली लग्नाला बाहेर गेल्या असताना डॉ. रोहितला अनुश्रीच्या मोबाइलवरून एसएमएस पाठवून जेवायला घरी बोलावते. घरात कोणीच नसताना अनुश्री आणि रोहित भेटतात आणि अचानक अनुश्रीच्या सासूबाई, तिच्या दोन मुली आणि तिचा घर सोडून गेलेला नवरा केदार परत येतात आणि या दोघांना पाहतात. पुढे काय होते, डॉ. रोहित आणि अनुश्री एकत्र येतात की, केदार आणि अनुश्री पुन्हा सुखाने संसार सुरू करतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील.चित्रपटाच्या शीर्षकापासूनच हा चित्रपट मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करतो. बाहुला-बाहुलीचे लग्न आणि त्या वेळी लहान मुलींचे चाललेले संवाद यातूनच चित्रपटाचा आशय उलगडत जातो. मृणाल कुलकर्णीला सुचलेल्या कथेला संवाद लेखिका मनीषा कोरडे हिने चांगलाच न्याय दिला आहे. मुख्य म्हणजे नात्यांची गुंतागुंत, चार पिढय़ांमधील नातेसंबंध, चार पिढय़ांच्या भावभावना यांचे चांगलेच प्रतिबिंब संवादातून दिसते.
चित्रपटाचा चेहरामोहरा अत्यंत ‘फ्रेश’ ठेवण्यात छायाचित्रणकार अमलेंदू चौधरी यांना चांगलेच यश आले आहे. त्यांची प्रत्येक फ्रेम बोलते. चित्रपट पाहताना रंगसंगती, प्रकाशयोजना आणि फुलांच्या उत्तम वापरामुळे खूपच टवटवीत वाटते, ही कमाल नक्कीच चौधरी यांच्या छायाचित्रणाची आहे. प्रत्येक फ्रेम लावताना त्यांचा संहितेचा अभ्यास दिसतो. कुठेही अनावश्यक धक्के बसत नाहीत.
मृणाल कुलकर्णीच्या दिग्दर्शनातही चांगलीच सफाई आहे. हा तिचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे, हे न पटण्याएवढे हे माध्यम तिला कळले आहे. विशेष म्हणजे तिचा चित्रपट संवादांपलीकडेही बोलतो. आपल्याला आवडणाऱ्या मुलाच्या वडिलांबरोबरच आपली आई लग्न करणार आहे, हे सहन न झाल्यामुळे अनुश्रीची मुलगी तिच्यावर वैतागते, हा प्रसंगही मस्तच जमला आहे. चित्रपट चालू असतानाच त्या प्रसंगातील एखादे पात्र पांढऱ्या पडद्यासमोर दिसते आणि ते पात्र आपले म्हणणे मांडते. प्रत्येक पात्राचा ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ अशा प्रकारे मांडण्याची कल्पनाही चांगली आहे. फक्त चित्रपटाचा वेग मध्येच खूप कमी झाल्यासारखा वाटतो. पण शेवटी हा चित्रपट पुन्हा एकदा वर जातो. मात्र केदारच्या पात्राला थोडा आणखी वाव देण्याची गरज होती, असे वाटत राहते.संगीत आणि गाण्यांच्या बाबतीतही मिलिंद इंगळे याने आपली जादू कायम असल्याचे दाखवून दिले आहे. सौमित्र व श्रीरंग गोडबोले यांचे शब्द आणि मिलिंद इंगळे यांची चाल हे समीकरण चांगलेच जुळून आले आहे. ‘या रस्त्यावर चालत असता वाटत राहते..’ हे गाणे तर चित्रपटात नेमक्या वेळी आल्याने ते ओठांवर गुणगुणत राहते. त्याशिवाय शेवटचे ‘एक प्रेम, दोन प्रेम, तीन प्रेम चार..’ हे गाणेही जमले आहे.
अभिनयाच्या बाबतीत पहिल्याच चित्रपटासाठी एवढे चांगले कलाकार मिळणे, हे दिग्दर्शिकेचे नशीबच म्हणायला हवे. स्वत: मृणालने अनुश्रीची भूमिका चांगलीच वठवली आहे. सचिन खेडेकर या माणसाला काय म्हणावे, हेच कळत नाही. वेगवेगळ्या चित्रपटांतील त्याच्या अत्यंत विविध भूमिका त्याच्या अभिनयकौशल्याची साक्ष देतात. डॉ. रोहितच्या भूमिकेतही त्याने त्याच्या नेहमीच्याच पद्धतीने रंग भरले आहेत. पल्लवी जोशीनेही एक करिअरिस्ट महिला, फक्त करिअरच्या मागे धावल्याने भावनिक पातळीवर एकाकी पडलेली बाई हे भाव मस्तच दाखवले आहेत. सुनील बर्वेला फारसे काम नसले, तरीही तो लक्षात राहतो. स्मिता तळवलकर, डॉ. मोहन आगाशे आणि सुहास जोशी यांनीही आपला अनुभव आपल्या कामात ओतला आहे. बाकी बच्चेकंपनीचीही कामे चांगली झाली आहेत. पण सर्वात जास्त लक्षात राहते ती अत्यंत ‘प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच’मध्ये वावरणारी नेहा जोशी. तिने सध्याच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व अगदी योग्य पद्धतीने केले आहे.
एकूणच चित्रपटाची भट्टी चांगली जमली आहे, पण कौटुंबिक चित्रपट पाहण्याची आवड नसलेल्यांनी या चित्रपटाच्या वाटय़ाला जाऊ नये.
‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं!?’
कथा, दिग्दर्शन – मृणाल कुलकर्णी, पटकथा व संवाद – मनीषा कोरडे , छायालेखन – अमलेंदु चौधरी, संगीत – मिलिंद इंगळे, कलाकार – मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, पल्लवी जोशी, सुहास जोशी, स्मिता तळवलकर, डॉ. मोहन आगाशे, नेहा जोशी आणि चार बालकलाकार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा