Bhagya Dile Tu Mala: कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील राजवर्धन- कावेरी ही जोडी अल्पावधीतच सर्वांची आवडती झाली आहे. या दोघांमध्ये ऑन स्क्रीन इतकीच कमाल केमिस्ट्री प्रत्यक्षातही पाहायला मिळते. म्हणजेच काय तर जितके खास मित्र राजवर्धन आणि कावेरी आहेत तितकीच मैत्री हे पात्र साकारणारे कलाकार विवेक सांगळे व तन्वी मुंडले यांच्यात खऱ्या आयुष्यातही आहे. आता इतके खास मित्र म्हणजे अर्थात एकमेकांचे सिक्रेट्स यांना माहित असणारच. असंच एक सिक्रेट राजवर्धनने म्हणजेच विवेक सांगळेने लोकसत्ताशी गप्पा मारताना शेअर केलं आहे.
मालिकेत तन्वी मुंडले साकारत असणारं पात्र म्हणजेच कावेरी ही अत्यंत पारंपरिक व रीती पाळून जगणारी मुलगी आहे असे दाखवले आहे, तर त्याच वेळी राजवर्धन म्हणजे विवेक सांगळे हा मॉडर्न विचारांचा दाखवण्यात आला आहे. अनेकदा पार्टी किंवा कोणत्या खास प्रसंगी जेव्हा बाकी सर्वजण मॉडर्न कपडे घालतात तेव्हाही कावेरी मात्र पंजाबी ड्रेस किंवा साडीतच बघायला मिळते यामुळे अनेकदा राजवर्धन कावेरीला काकू अशी हाक मारतो. राजवर्धनचं हे काकू हाक मारणं कावेरीला मालिकेत जरी आवडत नसलं तरी प्रत्यक्षात जेव्हा चाहते तिला भेटून गंमतीत काकू हाक मारतात तेव्हा तिला कुठेतरी मनात आनंदच होतो, असे विवेकने सांगितले.
विवेक सांगतो की, गणपतीच्या निमित्ताने आम्ही काही सार्वजनिक गणपती मंडळात जातो तेव्हा मालिका फॉलो करणारी मंडळी तन्वीला गंमतीत काकू म्हणून हाक मारतात. पण आपल्या पात्रावरून किंबहुना त्यातील एखाद्या सामान्य पैलूवरून आपण समोरच्याच्या लक्षात राहणे हे कोणत्याही कलाकारासाठी खास असते. त्यामुळे जरी चाहते तन्वीला काकू म्हणत असले तरी ती त्याचा राग न करता उलट एन्जॉयच करते.
तन्वी आणि विवेकची जोडी रील्सवर सुद्धा भलतीच हिट आहे. अनेकदा मालिकेच्या सेटवरूनही दोघे रील्स बनवून पोस्ट करत असतात. त्यांचे रील्स व मैत्री प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरत आहे.
तन्वी मुंडले इंस्टाग्राम
दरम्यान राजवर्धन- कावेरीच्या जोडीने भाग्य दिले तू मला हि मालिका घरोघरी पोहचवली आहे. नुकतेच मालिकेचे १५० भाग पूर्ण झाले असून येत्या काळातील १००- १५० भाग वेगवेगळे ट्विस्ट घेऊन येणार आहेत असेही विवेकने सांगितले.