‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. भाग्यश्रीने नुकतंच अभिनेत्री कंगना रनौतने ‘थलायवी’ या चित्रपटात जयाललिताच्या आईची भूमिका साकारली आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील साध्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. पण, या चित्रपटात झळकल्यानंतर मात्र भाग्यश्रीने या क्षेत्रातून काढता पाय घेतला. सलमानसोबत स्क्रीन शेअर करत पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर भाग्यश्रीच्या करिअरची दणक्यात सुरुवात झाली खरी. त्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. पण, त्या सर्व ऑफर्स तिने नाकारल्या. चित्रपटसृष्टीतून तिचं असं अचानक दूर जाणं बहुतेक जणांना खटकलं. मात्र इतक्या वर्षांनंतर आता खुद्द भाग्यश्रीनेच चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेण्याचा निर्णय का घेतला? त्यानंतर आता इतक्या वर्षांनी पुन्हा सिनेसृष्टीत परतल्याचे कारण तिने स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी सिनेसृष्टीतून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मला अजिबात दु:ख वाटत नाही. मी माझ्या करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले. मी स्वत:ला फार भाग्यवान समजते. मला माझ्या नवऱ्याला लपवायचे नव्हते. तसेच करिअरमुळे मला लग्न करता येत नाही, ही खंतही मला कधीच बोलून दाखवायची नव्हती. त्यामुळे मी वेळेत लग्न केले. मला दोन मुलं आहेत. सध्या ती त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत,” असे भाग्यश्रीने सांगितले.

“कधीकधी तर माझी दोन्ही मुले मला सांगतात, ‘जा सुमन जा, जी ले अपनी जिंदगी’. चित्रपटातील हे वाक्य मला तंतोतंत लागू होतं. त्यांच्या समर्थन आणि प्रोत्साहनामुळेच मी पुन्हा सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.” असेही भाग्यश्रीने स्पष्ट केले.

भाग्यश्रीच्या मते, “१९-२० या वयात प्रसिद्धी सोडणे हा एक फार मोठा निर्णय होता. जर तुम्हाला कुटुंब, समाज आणि करिअर सांभाळताना समस्या येत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. पण, एक स्त्री म्हणून माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. त्यात अभिमन्यूचाही जन्म झाला होता. त्यामुळे मी जवळपास सर्वच ऑफर्स नाकारल्या. पण, त्याबद्दल मला कधीही खंत वाटली नाही.”

सलमानसोबत काम करायला नक्की आवडेल

यावेळी भाग्यश्रीला सलमानसोबत पुन्हा काम करण्याबद्दल विचारण्यात आला असता, ती म्हणाली, “मी गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानला भेटली नाही. सलमान हा फार उत्कृष्ट अभिनेता आहे. तो फार तरुण कलाकारांसोबत काम करतो. मात्र जर भविष्यात सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्विकारेन,” असेही तिने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagyashree reveals she would love to reunite with maine pyar kiya costar salman khan nrp