‘मैने प्यार किया’ या सूरज बडजात्यांच्या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणारी आणि आजही केवळ त्या एका चित्रपटापुरती कायमची लक्षात राहिलेली भाग्यश्री इतक्या वर्षांनंतर पुन्हा परतते आहे. मात्र, यावेळी ती छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. ‘लाइफ ओके’ वाहिनीवरच्या नव्या मालिकेत भाग्यश्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खरे तर, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, सध्या तो पडद्यावर पूर्ण तयारीने येण्यासाठी मेहनत घेत असल्याने दरम्यानच्या काळात खुद्द भाग्यश्रीनेच छोटय़ा पडद्यावर यायचा निर्णय घेतला असावा बहुधा..
सूरज बडजात्यांच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून आलेली भाग्यश्री आणि सलमानच्या जोडीला लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्यानंतर भाग्यश्रीने हिमालय नावाच्या उद्योजकाशी विवाह केलाच. शिवाय, त्याच्या हट्टाखातर इतर कोणाबरोबरही चित्रपट करण्याचे नाकारत केवळ आपल्या नवऱ्याबरोबर दोन-तीन चित्रपट केले. ते चित्रपट सपशेल आपटल्यानंतर भाग्यश्रीने जवळपास चित्रपट संन्यासच घेऊन टाकला. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळात भरत जाधवसोबत आलेला एक मराठी चित्रपट आणि काही भोजपुरी चित्रपट वगळता तिने चित्रपट क्षेत्राकडे गांभिर्याने वळून पाहिले नव्हते. काही मालिकांतून तसेच रिअॅलिटी शोमधून भाग्यश्रीचे छोटय़ा पडद्यावर दर्शन झाले होते, पण छोटय़ा पडद्यावरील कामातही ती फारशी रमली नव्हती. सध्या अभिमन्यूला पदार्पणासाठी चांगला चित्रपट मिळावा, यासाठी तिने सलमानकडेही शिफारस केली आहे. अभिमन्यू जेव्हा चित्रपटात दिसेल तेव्हा दिसेल. मात्र, इतक्या वर्षांनंतर भाग्यश्रीला पुन्हा काम करताना पहायला मिळणार आहे.
‘लाइफ ओके’च्या आगामी ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत भाग्यश्री मुख्य भूमिका करणार आहे. आपल्या हरवलेल्या मुलीच्या शोधात असलेल्या आईची भूमिका भाग्यश्री करत आहे. आपल्या मुलीचा त्रिशाचा शोध घेताना तिला आपल्या कुटुंबाचे, नात्यांचे खरे रूप दिसू लागते, अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेच्या कथेत कटकारस्थाने आहेत. आणि ती माझ्या व्यक्तिरेखेभोवती फिरत असल्याने या मालिकेत जे नाटय़ निर्माण झाले आहे त्याने मला आकर्षित केले, असे भाग्यश्रीने सांगितले. खूप वर्षांनी मनोरंजन क्षेत्रात परतले असल्याने सगळेच थोडे अवघड वाटते आहे. पण, मी खूप खूष आहे, असेही भाग्यश्रीने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा