‘भजन सम्राट’ अनूप जलोटा आणि पंजाबी सिंगर जसलीन मथारू यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओमध्ये अनूप जलोटा हे जसलीनसाठी एक रोमॅण्टिक गाणं गाताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पंजाबी सिंगर जसलीन हीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय. जसलीनने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर पुढच्या काही मिनिटांतह तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील हास्यास्पद प्रतिक्रिया देत या व्हिडीओचा आनंद घेतलाय.
या व्हिडीओमध्ये अनूप जलोटा हे खूर्चीवर बसलेले दिसून येत आहेत. त्यांच्या बाजुला बसलेली जसलीन केसांशी खेळताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये अनूप जलोटा ‘मुझे जबसे हुआ है प्यार’ या गाण्यावर लिपसिंग करताना दिसून आले.
View this post on Instagram
या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडत आनंद घेतला. कोणी यांचं कौतुक करतंय तर कोणी दोघांमध्ये वयाच्या फरकावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. या व्हिडीओच्या पोस्टवर एका युजरने कमेंट देत लिहिलं की, “जर तुम्ही दोघे रिलेशनमध्ये असाल तर सगळ्यांसमोर कबूल करा, पण विद्यार्थी या नात्याचं नाव नका खराब करू !”. तर आणखी एक युजरने लिहिलं, ” कधी विद्यार्थिनी तर कधी गर्लफ्रेंड !”.
अनूप जलोटा आणि जसलीन हे दोघेही सलमान खानच्या ‘बिग बॉस १२’ मध्ये एकत्र आले होते. तेव्हापासून त्या दोघांच्या नात्यांबद्दल भरपूर चर्चा होऊ लागल्या. या शोमध्ये दोघांनी जोडीने एन्ट्री केली होती. हे पाहून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या. परंतु ‘बिग बॉस १२’ मधून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगताना ते दोघे केवळ गुरू-शिष्य असल्याचं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय. तसंच बिग बॉसच्या घरात ते जे काही बोलले होते ती फक्त मस्करी होती, असंही या दोघांनी सांगितलं.
‘वो मेरी स्टुडंट है’ चित्रपट येतोय भेटीला
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली जसलीन आणि अनूप यांची जोडी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. दोघेही एकत्र बॉलिवूडच्या एका चित्रपटातून डेब्यू करणार आहेत. आतापर्यंत अनूप जलोटाना दोघांच्या नात्यांबद्दल विचारल्यानंतर जे नेहमी वाक्य वापरतात तेच या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलंय. ‘वो मेरी स्टूडंट है’ हे नाव ठेवल्यामुळे या चित्रपटासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटातील दोघांचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं. वर्षभर थांबूनही हीच परिस्थिती असल्याचं पाहून अखेर हा चित्रपट एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित करण्यासाठी तयार झालाय.