शेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, तर काही वाममार्गाला लागतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा ‘भाकर’ हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. ‘तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘वऱ्हाड चित्र’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पोहनकर यांनी केलंय.
‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.. ‘ या टॅग लाईनवर बेतलेला ‘भाकर’ चित्रपट येत्या २३ मे ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. ‘महेंद्र पवनकुमार सिंह आणि टीम’ प्रस्तुत या चित्रपटाची सहनिर्मिती चंद्रशेखर पिंपळे, चंद्रकांत मेहेरे यांनी केली आहे. ‘भाकर’ हा चित्रपट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांची जीवन जगण्याची कहाणी आहे. शेतकऱ्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थितीचा वेळेचा-काळाचा अभ्यास न करता येणारी पॅकेजेस, नैसर्गिक असमतोलता, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी तर दुसरीकडे त्याच्यातील तरून पिढी यातून बाहेर पडण्यासाठी वाईट मार्गाकडे वळते.. अशाच एका गावातील हताश तरुण एकत्र येतात व त्यांना साथ मिळते भाऊची. दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष सुरु होतो. यातील एक गट नक्षलवादाकडे वळतो. वेगळ्या धाटणीची वास्तवदर्शी कथा या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, तोच जर जगाचा विनाशक झाला तर.. आपल्या पोटाला ‘भाकर’ कोठून मिळणार. हा मध्यवर्ती विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे. किशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुलकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका आहेत.
‘भाकर’ ..शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध
शेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला.
First published on: 16-05-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhakar upcoming marathi movie