भरत जाधव हा मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. गेली अनेक वर्षं तो नाटक-मालिका-चित्रपट अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्याला मित्रही भेटले. त्याच्या मित्रमंडळींपैकी त्याचा एक खास मित्र म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे.
केदार शिंदे आणि भरत जाधव अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यातली मैत्री खूप जुनी आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये त्यांनी एकत्र काम केलं. तर केदार शिंदे दिग्दर्शित ‘सही रे सही’ या नाटकामध्येही भरतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या नाटकाला आणि या नाटकातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण या नाटकादरम्यान भरत जाधव आणि केदार शिंदे यांच्यात मोठं भांडण झालं होतं. याचा किस्सा भरतने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
आणखी वाचा : “हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण
तो म्हणाला, “‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकातील ‘गोड गोजिरी’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्यामुळे माझ्यात आणि केदारमध्ये एकदा भांडण झालं होतं. ‘सही रे सही’ या नाटकात गावाहून आलेल्या एका मुलाचं पात्र आहे. त्याच्या एंट्रीला ‘गोड गोजिरी’ हे गाणं लावून दामूसारखं करू या असं केदारचं म्हणणं होतं. तर ते एकदा झालंय म्हणून या नाटकात दुसरं काही तरी करू या असं माझं मत होतं. त्या वेळी आमचं भांडण झालं होतं. रागारागात केदार नाचशील तर यावरच; नाही तर नको करू या, असं बोलून गेला.”
पुढे तो म्हणाला, “आमचं भांडण झालं तेव्हा अंकुशही तिथेच होता. तो मला म्हणाला, केदारच्या म्हणण्यानुसार एक प्रयोग करून बघ. दिग्दर्शक म्हणून त्याचंही बरोबर आहे. अंकुशचं बोलणं मला पटलं. पहिल्याच प्रयोगाच्या वेळी त्या एंट्रीला तुफान टाळ्या आणि वन्स मोअर मिळाला. त्या एंट्रीनंतर मी आत जाऊन केदारला घट्ट मिठी मारली आणि सॉरी म्हणत तुझं बरोबर होतं, असं त्याला सांगितलं.