भरत जाधव हे मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध नाटक, मालिका चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना चाहत्यांचे विविध अनुभवही आले. यापैकी एक अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला आहे.
हेही वाचा : “हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण
भरत जाधव प्रेक्षकांमध्ये खूप लाडके आहेत. त्यांचं काम लाईव्ह पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करतात. तर त्यांच्या कामाचं भरभरून कौतुकही होत असतं. एकदा भरत जाधव यांच्या चाहत्याने थेट त्यांनाच नाटकाच्या तिकिटाचे पैसे दिले असा खुलासा त्यांनी केला.
आणखी वाचा : “मनोरंजनविश्वात बरंच गॉसिपिंग असतं, त्यामुळे…,” भरत जाधवने मांडलं स्पष्ट मत
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “सही रे सहीच्या नाशिकमधील एका प्रयोगाला एका प्रेक्षकाकडे चुकून दोन तिकीटं आली. तो तसाच बाल्कनीत बसला आणि नाटक संपल्यावर सगळे जेव्हा भेटायला येतात तेव्हा तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की हे घ्या वरचे पैसे. मी त्याला विचारलं की, हे कसले पैसे? त्यावर तो म्हणाला, मी तुमचं एक तिकीट फुकट घालवलं. माझ्याकडे चुकून दोन तिकीटं आली. मी खाली जाऊन एक तिकीट परत करण्याचा आळस केला. माझ्या बाजूची एक खुर्ची रिकामीच होती. पण तुमचं काम पाहिलं, तुम्हा सर्वांची मेहनत पाहिली आणि इतक्या हाउसफुल प्रयोगातील एक सीट आपल्यामुळे रिकामी राहिली हे योग्य नाही. त्यामुळे हे त्या तिकिटाचे पैसे.” आता भरत जाधव यांचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.