अभिनेते भरत जाधव यांनी आत्तापर्यंत विविध नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच एक उत्तम विनोदी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. नाटक, चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्येही भरत जाधव झळकला आहेत. ‘सही रे सही हे’ त्याचं नाटक अजूनही सुरु आहे तसंच ‘अस्तित्व’ हे गंभीर विषय असलेलं नाटकही लोकांना आवडतं आहे. दरम्यान नाटकाच्या वेळी एखादा विनोद कसा फसू शकतो हे भरत जाधवने सांगितलं आहे. तसंच दादा कोंडकेंची एक आठवणही सांगितली आहे.

काय म्हटलं आहे भरत जाधवने?

अस्तित्व नाटकात भरत जाधव काम करणारच नव्हता. तो निर्माता म्हणून हे नाटक ऐकणार होता. अविनाश नारकर आणि चिन्मयी सुमीत यांनी या नाटकात काम करायचं ठरलं होतं. भरतने सांगितलं मी नाटक ऐकलं ते मला आवडलं. मात्र अविनाश नारकरच्या तारखा मॅच होईनात. त्यानंतर मग मला लेखक म्हणाला दादा तुम्हीच नाटक केलंत तर बरं होईल. मी त्याला सांगितलं की माझी इमेज विनोदी नट अशी आहे त्यामुळे नाटकाचं भजं नको व्हायला. मग आम्ही काही लोकांशी बोललो त्यांच्याही तारखांचा विषय आला. शेवटी मी प्रमोशन आणि जाहिराती यातले काही बदल केले आणि हे नाटक केलं. सही रे सही या नाटकाच्या शेवटीही मी प्रेक्षकांशी या नाटकाबद्दल संवाद साधत असे. त्यामुळे आपल्याला भरतचं गंभीर नाटक बघायचं आहे ही मानसिकता घेऊन प्रेक्षक नाटकाला येतात. त्याचा मला फायदा झाला असं भरतने सांगितलं. हसरे गांभीर्य या कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णी यांनी भरत जाधवची मुलाखत घेतली. या मुलाखतीत भरतने हे सांगितलं तसंच विनोदी नाटकातला फसलेला किस्साही सांगितला.

हे पण वाचा- Photos: ‘सही रे सही’ फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फसलेला विनोद कुठला विचारताच भरतने दिलं खास उत्तर

तुझा फसलेला विनोद कुठला असं विचारलं असता भरत म्हणाला, ऑल द बेस्ट नाटकात मी मुक्याची भूमिका करायचो. त्यावेळी मला देवेंद्र पेम म्हणाला, तू एकदा आय लव्ह यू म्हण त्यानंतर संवाद म्हण अरे एवढं मनातून बोलतोय तरी कसं ऐकू येत नाही हिला. मनातल्या मनात बोलून फायदा काय? तिला ऐकू गेलं पाहिजे असंही म्हण. असं मला देवेंद्र पेमने सांगितलं. लोकांमधून चक चक ऐकू आलं अरे तो बोलला. कलाकाराने चुकू नये असं म्हणत त्यांना माझी कीव आली. हा विनोद फसला म्हणजे फारच फसला. ऑल द बेस्टचे आमचे सततचे दौरे सुरु होते. मला सर्दी खोकला झाला होता. मी बहिऱ्याशी बोलताना खुणवून बोलतो. त्यावेळी मला जोरदार शिंक आली. मी सॉरी म्हटलं. तो प्रयोग बालगंधर्वचा होता. समोरच्या रांगेतल्या बायका लगेच म्हणाल्या अगं हा बोलला का आत्ता? मी संजयला डोळा मारला आणि पुढे चल असं खुणावलं. हे दोन भन्नाट किस्से भरतने सांगितले. तसंच दादा कोंडकेंची आठवणही सांगितली.

दादा कोंडकेंबाबत काय म्हणाला भरत जाधव?

ऑल द बेस्ट नाटक बघायला दादा कोंडके आले होते. नाटक संपल्यावर त्यांनी मला, अंकुशला (अंकुश चौधरी) आणि संजय (संजय नार्वेकर) या तिघांना कडकडून मिठी मारली. मला त्यांनी बाजूला घेतलं आणि विचारलं की तू मुका होतास तरीही तुला काय सांगायचं आहे ते आम्हाला सगळ्यांनाच कळलं. मी त्यांना म्हटलं की अ, आ, ई, ई, उ, ऊ मध्ये बोलायचं कारण ती अक्षरं पोटातून येतात. त्यामुळे ते वाक्यही वाटतं आहे मुका आहे हे पण कळतं. त्यावर दादा कोंडके मला म्हणाले अरेरे मला जर हे आधी कळलं असतं तर मी मुका घ्या मुका चित्रपटात बॅ बॅ करत राहिलो नसतो. त्या माणसाची शिकण्याची वृत्ती आम्हाला दिसली. असाही किस्सा भरतने सांगितला.

Story img Loader