महाराष्ट्रात मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो. पण काही नाट्यगृहांमध्ये कलाकार तसेच प्रेक्षकांची देखील गैरसोय होताना दिसते. याबाबत मराठी कलाकारांनी बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट, व्हिडीओ शेअर केल्या. मात्र आजही काही नाट्यगृहांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. नुकतंच अभिनेता भरत जाधवला याचा अनुभव आला.

आणखी वाचा – Photos : सिद्धार्थ जाधवची कुटुंबाबरोबर दुबई ट्रिप, महागड्या गाडीची सफर अन् बरंच काही

भरतच्या ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. मात्र या प्रयोगादरम्यान हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. प्रेक्षक अक्षरशः बोंबा मारायला लागले. या परिस्थितीमध्ये नाटक मध्येच थांबवून भरतने महापौरांना फोन केला. पंखे नीट करणार नाही तोपर्यंत प्रयोग असाच थांबून राहिल असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. असं असलं तरी हा सगळा प्रकार नेमका कोणत्या नाट्यगृहामध्ये घडला हे भरतने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नमूद केलेलं नाही.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदारने देखील नाट्यगृहांच्या परिस्थितीबाबत संताप व्यक्त केला. विशाखाने बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांबद्दल एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केलं. नाट्यगृहामधील बाथरुमची अवस्था, त्यामुळे कलाकारांना होणारा त्रास, घाणेरडा वास अशा अनेक विषयांवर ती बोलली होती.

याशिवाय अभिनेता आस्ताद काळेने ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये नाट्यगृहाच्या बाथरुममध्ये वाया जाणारं पाणी, त्याची अवस्था याबाबत तो बोलला. यापूर्वीही त्याने असे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

कलाकारांनी अनेकदा नाट्यगृहांची अवस्था आणि त्यामुळे प्रेक्षक कलाकारांवर होणारा परिणाम याबाबत आपलं मत मांडलं. राग व्यक्त केला. पण परिस्थिती काही बदलेली नाही. अजूनही प्रयोगादरम्यान कलाकारांची गैरसोय ही होतेच. नाट्यगृहांचं रुप कधी बदलणार? असा प्रश्न नेहमीच रंगकर्मी विचारताना दिसतात.

Story img Loader