जगभरातील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणारा महोत्सव म्हणजे ‘कान.’ हा महोत्सव वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असतो. कानसाठी जगभरातून निवडले जाणारे चित्रपट, बॉलिवूडमधून कानवारी करणारे चित्रपट, सरकारी कृपेने का होईना कान महोत्सवाला हजेरी लावणारे मराठी चित्रपट आणि कानच्या रेड कार्पेटवर झळकणारे आपले देशी सितारे अशी कितीतरी धामधूम या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने होत असते. आता या महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर ८ जुलै रोजी महोत्सवात होणार आहे.
सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील एक हृदयस्पर्शी कथा ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांतून स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या “मनातल्या उन्हात”, “ड्राय डे” या चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या अनुभवी दिग्दर्शकानं आता अतिशय हळुवार आणि भावनिक कथेची मांडणी “भारत माझा देश आहे” या चित्रपटातून केली आहे.
दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले, की आतापर्यंत विविध महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. आता “कान”(मारशे डू) चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवातील प्रदर्शनामुळे या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची पटकथा निशांत धापसे यांनी लिहिली आहे तर नागराज दिवाकर यांनी छायांकन, निलेश गावंड यांनी संकलन, समीर सामंत यांनी गीतलेखन, आश्विन श्रीनिवासन यांनी संगीत, गंगाधर सिनगारे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, राजरवीसिंहराजे गायकवाड, देवांशी सामंत, नम्रता साळोखे अशी उत्तम स्टारकास्ट आहे.