कॉमेडियन भारती सिंह तिच्या दिलखुलास आणि विनोदी अंदाजाने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीने तिच्या विनोदी शैलीने अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केलीय. नुकत्याच मनिष पॉलला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीने तिच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टींचा खुलासा केलाय ज्या अनेकांना माहित नाहीत. या चॅट शोमध्ये भारतीने सुरुवातीच्या काळात जेव्हा ती स्टेज शो करायची तेव्हा आलेल्या काही वाईट अनुभवांवर देखील भाष्य केलंय.

या मुलाखतीत भारतीने सांगितलं की सुरुवातीच्या काळात ती स्टेज शोसाठी आईला सोबत घेऊन जायची. ती म्हणाली, “माझी आई माझ्यासोबत शोमध्ये यायची. लोक म्हणायचे काकू तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमची काळजी घेऊ. तेव्हा मला मॉर्डन गोष्टींबद्दल एवढं माहित नव्हतं. कुणीतरी माझ्या कमरेवर हाताने स्पर्श केला. मला कल्पनाही नव्हती की मुलींसाठी हा वाईट स्पर्श असतो. ” असं भारती म्हणाली.

हे देखील वाचा: “तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता”; ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या मुलाखतीत मनिषने भारतीला तिला देखील शोमध्ये असे काही अनुभव आले आहेत का? असा प्रश्न विचारला. यावर भारती म्हणाली, “हो अनेक वेळा. अनेकदा जे कॉर्डिनेटर तुम्हाला पैसे देतात, ते तुमच्या कमरेवर हात घासतात. तेव्हा खूप विचित्र वाटतं.मात्र ते माझ्या काकांसारखे असायचे त्यामुळे मला वाटायचं ते चुकीचे नसतील मीच चुकीची आहे. तेव्हा मला माहित नव्हतं की या गोष्टी वाईट असतात.” असं म्हणत भारतीने तिचा विचित्र अनुभव शेअर केला.

प्रत्येक महिलेला देवाने एक शक्ती दिलीय ज्यामुळे तिला समोरच्या व्यक्तीचा उद्देश लक्षात येतो. जर समोरच्या व्यक्तीचा उद्देश योग्य नसेल तर महिलेला ते लक्षात येतं असं भारती म्हणाली. “मला वाटतं मी मूर्ख होते जे या गोष्टी समजू शकले नाही.” असं भारती म्हणाली. मात्र आता स्वत: साठी लढा देण्याची ताकद आपल्यात असून आता या गोष्टीचा लढा देण्यासाठी सक्षम असल्याचं भारती म्हणाली.

भारती सिंह पती हर्षसोबत सध्या ‘डान्स दीवाने’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे.