Happy Birthday Dream Girl Hema Malini: ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांचा आज वाढदिवस. गेली अनेक दशकं कलेचं सादरीकरण करून नटराजाची सेवा करणाऱ्या त्या एक अभिनेत्री आहेत. अभिनेत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांचं नेहमीच सर्वत्र कौतुक होत असतं. अभिनेत्री असण्याबरोबरच त्या उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नृत्यप्रवासाचा घेतलेला हा आढावा…
हेमामालिनी नृत्यसाधक आहेत. गेली अनेक वर्षं त्या नृत्यकलेची साधना करतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तो नृत्यप्रकार होता भरतनाट्यम. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी नृत्य शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या आठव्या वर्षापासून त्या रंगमंचावर त्याचं सादरीकरणही करू लागल्या. त्या समरस होऊन नृत्य सादर करायच्या. अनेक वर्षं त्यांनी भरतनाट्यमचे सोलो कार्यक्रम केले. त्याबरोबरच त्यांनी भरतनाट्यमचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमही पूर्ण केला. आजही त्या जेव्हा भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर करतात तेव्हा सर्व प्रेक्षक मोहित होतात.
त्यांनी कधीही त्यांच्या नृत्यात एकसुरीपणा आणला नाही. त्यांचा मूळ स्वभावच नवनवीन गोष्टी शिकण्याचा असल्यामुळे त्यांनी भरतनाट्यमव्यतिरिक्त कुचिपुडी व मोहिनीअट्टम या दोन नृत्यप्रकारांचंही शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं. नृत्यात आणि त्यांच्या सादरीकरणात त्या सतत नवनवीन प्रयोग करीत राहिल्या. भरतनाट्यमबरोबरच त्यांनी कुचिपुडी व मोहिनीअट्टमचेही अनेक कार्यक्रम केले आहेत. जसंजसं त्यांचं वय वाढत गेलं तसतसे त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक बदल घडले. त्यांचं लग्न झालं. काही वर्षांनी त्यांना दोन मुली झाल्या; पण त्यांनी त्यांच्या नृत्यसाधनेमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. निशा व अहानाच्या वेळेला गरोदर असतानाही त्यांनी त्यांचे नृत्याचे कार्यक्रम थांबवले नाहीत. अवघड हालचाली टाळत, स्वतःची काळजी घेत त्यांनी नृत्य सादरीकरण केलं. दोन्ही मुलींच्या जन्मानंतर त्यांनी वाढलेलं वजन कमी करण्याचा ध्यास घेतला आणि ते यशस्वीपणे कमी केलंही. त्या सुमारास हेमामालिनी एकट्या कलाकाराला सादर करता येतील अशाच प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम करायच्या. पण, त्यामुळे त्यांच्यामधील कलाकार काहीसा भुकेला राहत होता. एका मुलाखतीमध्ये याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं होतं, “मी एकटी कार्यक्रम करीत असल्यामुळे मला काही मर्यादा यायच्या. मी जे करत होते, त्यापेक्षा मला काहीतरी मोठं करायचंय त्या आणि त्यासाठी मला साथीदारांची गरज होती. त्यांच्याशिवाय माझी अभिव्यक्ती मला अपूर्ण वाटत होती.”
हेमा मालिनी वरचेवर त्यांच्या गुरुमांशी संपर्कात असायच्या. १९८७ साली त्यांनी नेहमीप्रमाणेच गुरुमांना फोन केला. तेव्हा गुरुमांनी त्यांना नृत्याचं स्वरूप बदलण्याचा सल्ला दिला आणि हेमामालिनी यांना त्यांनी बॅले हा नृत्य प्रकार सादर करण्याचा सल्ला दिला. मांचे शब्द हेमामालिनींसाठी परमेश्वराचे शब्द होते. त्यामुळे हेमामालिनी यांनीदेखील मांच बोलणं गांभीर्यानं घेतलं. हा नृत्यप्रकार त्यांच्यासाठी अगदी वेगळा होता. एका रविवारी टीव्ही बघत असताना त्यांना डीडी नॅशनलवर भारतीय कला केंद्राचं एक बॅले नृत्य पाहायला मिळालं. त्या बॅलेमधून रामायणाची कथा सादर होत होती. त्या बॅलेमधील एका नर्तकानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. भूषण लखान्द्री, असं त्या नर्तकाचं नाव होतं. भूषण त्या बॅलेमध्ये नारदमुनींची भूमिका करीत होते. हेमामालिनी यांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडून भूषण यांचा फोन नंबर मिळवला आणि लगेचच त्यांच्या जुहू येथील घरी त्यांना भेटायला बोलावलं. हेमामालिनी यांनी त्यांना विचारलं, “मला बॅले करायचा आहे. तुम्ही एखादा विषय सुचवाल का?” भूषण यांनी हेमामालिनींकडे तेव्हा काही वेळ मागून घेतला आणि नंतर त्यांना नाट्यमल्लिकाची कल्पना सुचवली. ती कल्पना हेमामालिनींना खूप आवडली; पण बॅले नृत्यप्रकार करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या एकट्या कार्यक्रम करीत आल्या होत्या. चित्रपटातल्या नृत्यांमधे त्यांच्याबरोबर खूप कलाकार असायचे. पण, चित्रपट हे पूर्णपणे वेगळं माध्यम होतं; तर लाइव्ह नृत्याच्या कार्यक्रमाची समीकरणं वेगळी होती. याबाबत हेमामालिनी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या, “रंगमंच ही मला माझी जहागिरी वाटायची. स्टेजवर एकट्यानं नृत्य करताना कलाकार सार्वभौमत्व अनुभवत असतो. आता माझ्या मुलखावर इतरांचं आक्रमण होणार होतं. माझ्या स्वातंत्र्यावर मर्यादा येणार होत्या. पण ‘बॅले’नं खरोखरच माझ्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं. मी अनेक गोष्टींशी जुळवून घ्यायला शिकले. २०-२२ नर्तकांबरोबर मला माझ्या हालचाली जुळवून घ्यायच्या होत्या आणि ते मला बॅले या नृत्यप्रकारामुळे शिकता आलं.”
कलेची खरी सेवा ही फक्त ती सादर करण्यात नाही, तर त्याचा प्रसार करण्यातही आहे, हे हेमामालिनी जाणत होत्या. अनेक वर्षं त्यांनी विविध नृत्यप्रकार शिकले आणि ते सादर केले; पण ही कला फक्त आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता ती हजारो लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली. ‘नाट्यविहार कला केंद्र’ असं या अकॅडमीचं नाव आहे. गेली अनेक वर्षं या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे विविध प्रकार शिकवले जात आहेत. शास्त्रीय नृत्याबरोबरच हेमामालिनींनी सादर केलेला ‘मीरा’ हा त्यांच्या ‘नाट्यविहार कला केंद्राचा’ कथ्थकमध्ये बसवलेला एकमेव बॅले आहे. याव्यतिरिक्त नाट्यविहार कला केंद्राच्या कलाकारांनी ‘रामायण’, दुर्गा देवीवर, सावित्रीवर आधारित कथांचंही सादरीकरण बॅलेमधून केलं. या कलाविष्काराचे देशात आणि परदेशांत अनेक प्रयोग झाले होते.
आज वयाच्या ७५ व्या वर्षीही हेमामालिनी तितक्याच सुंदर आणि नाजूक प्रकारे शास्त्रीय नृत्य आणि बॅले यांचं सादरीकरण करतात. त्यांची ही ऊर्जा आणि जिद्द सर्वांनाच प्रेरणादायी आहे. अशा या नृत्यतपस्वी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!