गेल्या काही दिवसापासून पडद्याआड गेलेला विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा द कपिल शर्माच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू होणार असल्यामुळे या शोमध्ये कोणते नवे कलाकार झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. विशेष म्हणजे कधीकाळी प्रतिस्पर्धी ठरलेले भारती सिंग आणि कृष्णा हे कपिलसोबत या शो मध्ये झळकणार आहेत.

विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने काही काळ पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र आता तो नव्या उत्साहात प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाला असून यावेळी भारती आणि कृष्णा त्याला साथ देणार आहेत.

‘कधीकाळी प्रतिस्पर्धी ठरलेल्या कपिलसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली असून यावेळी कृष्णादेखील माझी साथ देणार आहे. त्यामुळे आमच्या तिघांची जोडी प्रेक्षकांना खळखळून हसवेल यात शंका नाही. या शोमध्ये शुमोन चक्रवर्ती आणि किकू शारदादेखील दिसून येणार आहेत’, असं भारतीने सांगितलं.

दरम्यान, भारती आणि कृष्णा यांच्या विनोदामुळे आजवर अनेक जण मनमुराद हसले आहेत. त्यामुळे ते या शोमध्ये झळकले तर प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवानी ठरणार आहे हे मात्र निश्चित.