मराठी कलाविश्वातील अनेक नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक विनोदवीर म्हणजे भाऊ कदम म्हणजेच भालचंद्र. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे भाऊ घराघरांत पोहोचला. भाऊने स्वतःचं युट्यूब चॅनलही सुरु केलं आहे. शिवाय त्याची मुलगी मृण्मयीही बरीच चर्चेत असते. मृण्मयीने वयाच्या १८व्या वर्षीच स्वतःचा व्यवसाय सुरु केला. शिवाय तिचं युट्यूब चॅनलही आहे. पहिल्यांदाच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या स्किन टोनबाबत भाष्य केलं आहे.
मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं. २०२०मध्ये तिने ‘तारुंध्या’ हा ब्रँड सुरू केला. मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ (Scrunchies)चा व्यवसाय आहे. शिवाय ती व्हिडीओद्वारे मेकअप तसेच फॅशन टिप्स देताना दिसते. ‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या त्वचेचा रंगाबाबत भाष्य केलं आहे. तिने यावेळी तिला आलेला अनुभवही सांगितला.
“एखादी मुलगी दिसायला कशी आहे? याबाबत अजूनही आपल्या समाजात बोललं जातं. युट्यूबर, फॅशन विषयी व्हिडीओ तयार करत असताना याबाबत तुला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला का?” असा प्रश्न मृण्मयीला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “माझे काका, आजी, पप्पा सगळेच सावळे आहेत. माझी आई फक्त गोरी आहे. पण माझ्या लहानपणापासूनच मला कोणी त्वचेच्या रंगावरुन हिणावलं नाही”.
“मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला त्वचेच्या रंगाची कधीच भीती वाटली नाही. माझा स्किन टोन काय आहे याचा विचार मी कधी केलाच नाही. “तुझ्या स्किन टोनबाबत तुला खूप आत्मविश्वास आहे” अशा कमेंट मला माझ्या व्हिडीओवर येऊ लागल्या. पण मला असं वाटलं की, तुम्ही गोऱ्या मुलींनाही असं कधी विचारता का? दुसरी बाजू म्हणजे प्रेक्षकांनाही मी त्यांच्यातली वाटली. कारण स्किन टोनचा विचार न करता मी व्हिडीओ करत गेले”. मृण्मयीला आज सोशल मीडियाद्वारे हजारो लोक फॉलो करतात.