नाटक.. हा एक शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर येते ती तिकिटांची खिडकी, पडदा, तिसरी घंटा, रंगदेवता, नाट्यरसिक आणि ते दोन ते तीन तासांचे निख्खळ मनोरंजन. कधी खळखळून हसवणारं तर कधी आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं..
सामान्यतः अभिनय करायचा, हे तर अनेकांचेच स्वप्न असते. पण त्यात अनेकांना मालिका आणि त्यातूनही सिनेमांमध्येच अभिनय करण्यात अधिक स्वारस्य असते. क्रिकेटमध्ये जसे टेस्ट मॅचमध्ये खेळाडूची गुणवत्ता कळते, अभिनयाचेही काहीसे तसेच आहे. खरी गुणवत्ता ही रंगभूमीवर दिसून येते.
इथला प्रेक्षक हा चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा वेगळा असतो. मराठी रंगभूमी हे मराठी माणसांचे वेड आहे हे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मराठी रंगभूमी धोक्यात आहे. प्रेक्षक नाट्यगृहाकडे वळत नाही अशी बोंब जरी सगळीकडे उठत असली तरी ज्या संख्येने मराठी नाटकं रंगभूमीवर येत आहेत. ते पाहून रंगभूमी कधीही लोप पावणार नाही असेच म्हणावे लागेल. लोकसत्ता ऑनलाइनच्या या नवीन सदरातून आपण रंगभूमीशी एकनिष्ठ असलेले आणि प्रेमाने रंगभूमीची सेवा करणाऱ्या काही कलाकारांचे त्यांच्या आठवणीतले नाटकांचे अनुभव मांडणार आहोत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भालचंद्र कदम म्हणजे तुमचा आमचा भाऊ कदम सांगतोय त्याच्या पहिल्या नाटकाच्या अनुभवाबद्दल.
माझं पहिलं व्यावसायिक नाटकं होतं ‘एवढंच ना..’ मुलगी आणि वडील यांच्या नाजूक नात्याबद्दल हे नाटक भाष्य करायचे. या नाटकावेळी मी तरुण होतो, तरी ६० वर्षाच्या सेवानिवृत्त व्यक्तीची मी व्यक्तिरेखा साकारत होतो. या नाटकामध्ये सेवानिवृत्त झालेले बाबा आणि लग्न करुन सासरी जाणारी मुलगी यांच्याभोवती नाटकाची कथा फिरत होती.
नाटक संपल्यावर एक महिला पत्रकार माझी मुलाखत घेण्यासाठी आली होती. तिच्यासोबत तिचे बाबाही हे नाटक पाहायला आले होते. त्या महिला पत्रकाराचे वय या नाटकात दाखवण्यात आलेल्या मुलीएवढे होते तर तिचे बाबाही ६० च्या पुढचेच होते. कमी वयाचा असतानाही मी ६० वर्षांच्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली होती, याचे त्यांनी कौतुक केले. शिवाय त्यांच्यासारख्या अनेक बाबांच्या मनातली भावना या नाटकामुळे लोकांसमोर आली याचेही त्यांनी कौतुक केले. यानंतर अनेक नाटके केली, पण त्यांच्या डोळ्यातले ते भाव आणि तळमळतेने केलेलं कौतुक मी आजही विसरु शकलो नाही.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर