बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची लैंगिक आरोग्यबाबतची एक जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली. प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सीन्स या जाहिरातीमध्ये दिसल्यामुळे जाहिरातीला आणखीच प्रसिद्धी मिळाली. मात्र दुसरीकडे सिनेसृष्टीतील काही कलाकार आणि समाजातील मान्यवर लोक जाहिरातीवर टीका करत आहेत. आता या विषयावर जाहिरातीमध्ये काम केलेल्या भावना चौहान या अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या प्रतिक्रियेतून गमतीशीर माहिती पुढे आली. जाहिरातमध्ये WWE मधील प्रसिद्ध रेसरल जॉन सीना असणार अशी तिची समजूत झाली होती, पण नंतर तिला कळलं की, जाहिरातमीमध्ये जॉन सीना नसून जॉनी सीन्स आहे.
भावना चौहानने ‘जिया सुलतान’ (२०१५) या टीव्ही मालिकेमध्ये काम केलेले आहे. तसेच शिकारा (२०२०), हसी तो फसी (२०१४) अशा चित्रपटात तिने काम केलेले आहे. या जाहिरातीबद्दल बोलत असताना भावना चौहान म्हणाली की, जाहिरातीची स्क्रिप्ट जेव्हा वाचली, तेव्हा मला हे मजेशीर वाटले होते. त्यानंतर जाहिरातीसाठी ऑडिशन दिले.
इंडिया टुडे वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भावनाने जॉनी सीन्सबद्दल खुलासा केला. ती म्हणाली की, जाहिरातीपूर्वी मला जॉनी सीन्सबरोबर काम करायचे आहे, याची कल्पना नव्हती. मला वाटलं होतं की प्रसिद्ध रेसरल जॉन सीना या जाहिरातीमध्ये असणार आहे. मला माहीत नाही, मी त्यांचे नाव चुकीचे कसे वाचले. पण जॉनी सीन्स अशाप्रकारे जाहिरातीमध्ये दिसेल याचा विचार कुणीही केला नव्हता. मला वाटलं जगभरातील रेसरल भारतात नेहमी काम करत असतात त्याप्रमाणे जॉन सिना काम करण्यासाठी येत असेल. जाहिरातीच्या प्रत्यक्ष कामावेळी मला कळलं की, तो जॉन सीना नसून जॉनी सीन्स आहे.
जॉनी सीन्स खूप प्रोफेशनल
जॉनी सीन्सबद्दल धक्का बसला असला तरी रणवीर सिंहसह काम करून चांगलं वाटलं, असेही भावनाने सांगितले. रणवीरबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांच्या एनर्जीबरोबर आपली एनर्जी लावणे हा अनुभव खूप काही शिकवणारा होता. जॉनी सीन्सबरोबर अधिक काही बोलण्याची संधी मिळाली नाही, तो खूप प्रोफेशनल आहे, असेही भावनाने यावेळी म्हटलं.
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने या जाहिरातीवर टीका केली. इन्स्टाग्राम स्टोरीवर रश्मी देसाईने आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, ही जाहिरात पूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचा अपमान करणारी आहे. या विषयावर बोलताना भावनाने सांगितले की, टीव्ही इंडस्ट्रीची थट्टा-मस्करी करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. या जाहिरातीची स्क्रिप्ट थोडी गमतीशीर लिहिली गेली आहे. टीव्ही मालिकांमध्ये जसे सीन असतात त्यावरच ही जाहिरात बेतलेली आहे. पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर मुक्तपणे बोलले जावे, यासाठी जाहिरात केली गेली, असेही तिने सांगितले.