रात्रीच्या नीरव शांततेत माणसाला आपला आतला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं आयुष्य सर्वार्थानंच ‘सार्वजनिक’ असतं. तिथं ‘खासगी’ आयुष्य असलंच तर ते मनातल्या मनातच! किडय़ामुंग्यांसारखं आयुष्य जगणाऱ्या या माणसांना आतला आवाज असतो का? आणि असला तरी आतल्या आणि बाहेरच्या कोलाहलात आणि जगण्याच्या धबडग्यात तो कुणाला ऐकू तरी येत असेल का?
अशाच एका झोपडवस्तीत राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार, पण संवेदनशील तरुणाचा आत्मसंवाद लेखक संभाजी भगत आणि दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी ‘अडगळ’ या एकपात्री नाटकात मंचित केला आहे. जगाच्या भल्यासाठी आयुष्यभर वणवण करणाऱ्या; परंतु स्वत:च्या मुलांच्या भवितव्यासाठी मागे काहीच ठेवून न गेलेल्या बापाचा हा मुलगा! बापाच्या पश्चात आहे. आणि दोन बहिणींच्या जिवावर कसंबसं घर चाललेलं. लग्नाची वयं उलटून गेली तरी परिस्थितीच्या ओझ्याखाली पार वाकून गेल्यानं लग्नाचा विचार करणंही दुरापास्त. आणि बी.ए.पर्यंत शिकूनही नोकरी न मिळाल्याने फाक्या मारणारा हा तरुण. पंचविशी ओलांडली तरी पैही न कमावू शकणारा. सतराशे साठ ठिकाणी लेखी परीक्षा आणि मुलाखती देऊनही अद्याप कुठंच काही न जमल्यानं हताश, निराश अन् उद्विग्न झालेला. तशात गेले पाच-सहा महिने त्याची रात्रीची झोपही उडालीय. अवतीभवती गुणगुणणारे आणि चावा घेणारे डास, माळ्यावरच्या अडगळीत खुडबुडणारे उंदीर, वस्तीत रात्रभर चालणारी करुण सुरातली भजनं, पत्र्याच्या तकलादू भिंतीपलीकडे मैथुन करणाऱ्या शेजारच्या जोडप्याचे चित्रविचित्र आवाज आणि उष्ण श्वासांची धडपड, पलीकडच्या खोलीतल्या आजारी म्हातारीचं अखंड खोकणं, मधूनच कोसळणाऱ्या संततधार पावसाचा एकताल.. रात्रीची झोप उडायला हे बाहेरचे आवाज कारण असले तरी तक्याची झोप उडायचं तेवढंच कारण नाही. आपली बेकारी, भविष्यापुढचा अंधार, घराच्यांच्या विचारांनी येणारी बेचैनी, तारुण्यवश लैंगिक घुसमट आणि जगण्याची एकूणच झालेली अडगळ त्याला पोखरतेय. अस्वस्थ, बेचैन करतेय. तगमग.. तळमळ.. होरपळ.. अन् वाझोटं आत्मचिंतन! काहीच निष्पन्न होत नाही त्यातून. आणि काही मार्गही दिसत नाही या साऱ्यातून सुटण्याचा. आत्महत्येचा विचार येतो क्वचित मनात; पण ती करायलाही हिंमत लागते. ती तरी कुठं आहे त्याच्यात?
मग आठवणींची, जुन्या घटनाप्रसंगांची वेडीवाकडी, आडवीतिडवी आंदोलनं गरगरत राहतात त्याच्या मनात. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा विचार आणि विचारांचा एकच काला होतो त्याच्या मनात. त्याचं घुसमटलेपण शारीर जाणिवांतून ताठरतं. असह्य़ होतं. पण त्यातूनही मोकळं होता येत नाही. तडफड तडफड होतेय. जिवाची असह्य़ काहिली काहिली होतेय. आणि सोबतीला आठवणींचे, आजूबाजूच्या बकाल वास्तवाचे, वस्तीतल्या पशूवत जगण्याचे अन् आपल्या हतबलतेचे, असहायतेचे कढ त्याला असह्य़ होतात.
रात्रही संपता संपत नाही अन् झोपही येत नाही त्याला. या कोलाहलाने हे अरण्यरुदन त्याचं, त्याच्यापुरतंच धुमसत राहतं. माळ्यावरच्या अडगळीप्रमाणेच आपल्याही जिण्याची अडगळ झालीय, हे त्याला जाणवत राहतं.. खोल खोल आतवर. अडगळ : बिनकामाची; तरीही आतडय़ाशी नातं असलेली. कशी करून घ्यायची सुटका त्याच्यापासून?
संभाजी भगत यांच्या लेखणीतून उतरलेलं हे स्वगत आपल्या सुसंस्कृत, बेगडी संवेदनांच्या चिंधडय़ा चिंधडय़ा उडवत जातं. इतका वास्तवदर्शी ऐवज ‘अधांतर’सारखा एखादा अपवाद करता मराठी रंगभूमीवर आजवर अवतरलेला नाही. तळागाळातल्यांचं आयुष्य मराठी रंगभूमीवर आलंच नाही असं नाही; परंतु एवढय़ा समग्र आकलनाने आणि नागर संवेदनाची झालर नसलेली ही ‘अडगळ’ विरळाच, यातली भाषा, अभिव्यक्ती उघडीवाघडी आहे. बीभत्स वाटावी इतकी अंगावर येणारी आहे. पण हे जगणं सच्चं आहे.
ती नाकारता न येणारी वस्तुस्थिती आहे. माणसं स्वत:शीच संवाद साधताना अधिक खरी असतात. त्यातल्या बीभत्स विकृतीसह! गंमत म्हणजे किडय़ामुंग्यांचं आयुष्य जगणारी माणसं आत्मानंदी टाळी लावण्याची बात करत असतात. भजनांतून ती झिंग अनुभवतात. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं जगण्याचं मढं खांद्यावर घेऊन नव्या दिवसाला सामोरी जातात. संभाजी भगत यांनी स्वानुभूतीतून हे जगणं ‘अडगळ’मध्ये संक्रमित केलेलं आहे. दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी झोपडवस्तीतल्या सुशिक्षित बेकाराचं हे आक्रंदण तितक्याच अस्सलतेनं प्रयोगातून पोहोचवलं आहे. माळ्यावरची अडगळ आणि त्यावर झोपेची आराधना करत तळमळणारा, जगण्याच्या काचानं अस्वस्थपणे तगमगणारा एक तरुण जीव एवढय़ाच सामुग्रीत त्यांनी जीवनाचा एक सोलीव तुकडा, त्यातल्या अनेक पापुद्रय़ांसह उलगडून दाखवला आहे. नटाचं शरीर, त्याच्या हालचाली, त्याच्या डोक्यात चाललेलं विचारांचं थैमान आणि भोवतालातून अधूनमधून त्याला विचलित करणारे नानाविध आवाज.. यांच्या एकजिनसी कोलाहलातून हा अस्वस्थानुभव आपल्यापर्यंत पोहोचतो. संभाजी भगतांचं संगीत आणि अभिषेक खणकर यांचं पाश्र्वसंगीत यांचाही त्यात मोठा वाटा आहे. सचिन गोताड यांनी माळ्यावरची अडगळ त्यातल्या बारीकसारीक तपशिलांसाठी साकारली आहे. बंद पडलेला टेबलफॅन, दोन पत्र्याचे पेटारे, त्यातले कसर लागलेले फोटो आणि साडी व कोट, भजनाचे टाळ, भिंतीवर फुटलेला ढोल, कपडय़ाची बोचकी, पोपटाचा रिकामा पिंजरा, रद्दी.. आणखी काय काय! शिवानी डांगेंनी वेशभूषा आणि शरद सावंत यांनी रंगभूषेत कृतिमतेचा लवलेश राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे. राजेश शिंदे यांनी रात्रीच्या निरनिराळ्या प्रहरांतली त्या तरुणाच्या मनातली आंदोलनं प्रकाशयोजनेद्वारे सौम्य-गडद केली आहेत.
सुनील तांबट यांनी झोपडवस्तीतल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाचं दु:ख, त्याची तगमग, तडफड, भोवतालाने त्याच्याभोवती आवळलेला गळफास, परिस्थितीनं केलेली कोंडी, तरुण वयातली लैंगिक कुचंबणा, जगण्याबद्दलची त्याची तीव्र, तिखट प्रतिक्रिया आणि संस्कारांनी केलेली गोची.. हे सगळं प्रत्ययकारीतेनं व्यक्त केलं. अवघ्या देहबोलीतून त्यांची घुसमट प्रकट होते. ‘अडगळ फक्त माळ्यावरच नाही, तर तो स्वत:सुद्धा अडगळीचाच भाग बनू पाहतोय. होणार का तो अडगळ? की झटकून टाकणार आलेली मरगळ आणि नव्या उमेदीनं आयुष्याला सामोरा जाणार? एक प्रश्नचिन्ह! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा