भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी हे सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. वयाच्या ५१ व्या वर्षी ते पुन्हा वडील झाल्याची गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियावर बायकोबरोबरचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत मनोज यांनी नव्या पाहुणीच्या आगमनाची बातमी दिली आहे.
गेल्याच महिन्यात मनोज यांची पत्नी सुरभि तिवारी हिचं घरात डोहाळेजेवण पार पडलं. तेव्हा व्हिडिओ शेअर करत मनोज यांनी चाहत्यांना सरप्राइज दिलं होतं. तेव्हापासूनच मनोज यांचे चाहते त्यांच्या या गुड न्यूजसाठी उत्सुक होते. मनोज यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा : “महाराष्ट्राचा हँडसम हीरो…” वैदेही परशुरामीची प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासाठी खास पोस्ट
मनोज तिवारी यांना कन्यारत्न झालं असून ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवली आहे. फोटोमध्ये मनोज तिवारी यांची पत्नी रुग्णालयाच्या बेडवर दिसत आहे. फोटो शेअर करत मनोज यांनी लिहिलं की, “तुम्हाला सांगायला फार आनंद होत आहे की आमच्या घरी लक्ष्मीच्या पाठोपाठ सरस्वतीचं आगमन झालं आहे. घरात लहान मुलीचं आगमन झालं आहे. तिच्यावर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच असू द्या.”
सुरभि ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून मनोज यांना एक मुलगी आहे जीचं नाव रिती तिवारी आहे. २०२० मध्ये मनोज यांनी सुरभिशी लग्नगाठ बांधली आणि आता त्यांना कन्यारत्न झालं आहे. भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी नुकतंच त्यांना ४ अपत्य असण्याबाबत वक्तव्य केलं होतं. एकूणच गेले काही दिवस उत्तर भारतातील राज्यात लोकसंख्या हा मुद्दा चर्चेत आहे. मनोज तिवारी यांनी दिलेल्या या गोड बातमीमुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानाई येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.