प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
२५ वर्षीय आकांक्षाने १७व्या वर्षी भोजपुरी सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की २’ या चित्रपटांमुळे आकांक्षाला लोकप्रियता मिळाली. आजच(२६ मार्च) भोजपुरी अभिनेता पवन सिंहबरोबर तिचं ‘आरा कभी हारा नही’ गाणं प्रदर्शित झालं आहे.
हेही वाचा>> आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेली पोस्ट, निधनानंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशातील मिर्जापूर येथे २१ ऑक्टोबर १९९७ साली आकांक्षाचा जन्म झाला होता. तीन वर्षांची असताना ती स्वप्ननगरी मुंबईत आली होती. इन्स्टाग्राम व टिकटॉकवर रील बनवून आकांक्षा प्रसिद्धीझोतात आली. लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड असणाऱ्या आकांक्षाला आयपीएस ऑफिसर बनवण्याचं स्वप्न तिच्या वडिलांनी पाहिलं होतं. परंतु, आकांक्षाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं.
भोजपुरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. काम मिळत नसल्याने आकांक्षा २०१८ मध्ये नैराश्यात गेली होती. तिने मनोरंजनविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आईच्या सांगण्यावरुन तिने पुन्हा भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.