प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
आकांक्षा एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी वाराणसीमध्ये आली होती. तिच्यासाठी वाराणसीमधील सारनाथ परिसरातील हॉटेल सुमेंद्र रेसिडेंसीमधील रुम नंबर १०५ बुकिंग करण्यात आलं होतं. सकाळी उशिरापर्यंत आकांक्षाच्या रुमचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मास्टर चावीने दरवाजा उघडल्यानंतर आकांक्षाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं. आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्ट राहुल व हेअर आर्टिस्ट रेखा मोर्या यांनी खुलासा केला आहे. “२५ मार्चला संध्याकाळी आकांक्षा एका पार्टीसाठी गेली होती. ती आनंदी दिसत होती. तिला कोणत्यात प्रकारचा तणाव नव्हता. ती कोणालाही न घाबरता सिंहिणीप्रमाणे आयुष्य जगायची. आकांक्षा तिच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींची खूप काळजी घ्यायची”, असं ते म्हणाले.
हेही वाचा>> आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेली पोस्ट, निधनानंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेअर आर्टिस्ट रेखा मोर्याने आकांक्षाच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं ते सांगितलं. ती म्हणाली, “आकांक्षाला सकाळी ७ वाजता ‘लायक हूं मै नालायक नही’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार व्हायचं होतं. १० वाजले तरी हॉटेल रुममधून बाहेर न आल्याने तिला बघण्यासाठी एका क्रू मेंबरला पाठविण्यात आलं. खूप वेळा दरवाजा वाजवल्यानंतरही आकांक्षाने दरवाजा उघडला नाही. आकांक्षाच्या बाजूच्या रुममध्येच दिग्दर्शकांची खोली होती. तिच्या रुममधून पाण्याचा आवाज येत आहे. कदाचित ती बाथरुममध्ये असेल, असं दिग्दर्शकाने सांगितलं. परंतु, तरीही कित्येक वेळ दरवाजा न उघडल्याने मास्टर चावीने आकांक्षाच्या रुमचं दार उघडण्यात आलं. तेव्हा आकांक्षाने आत्महत्या केल्याचं समोर आलं”.
हेही वाचा>> Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाच्या रुममधून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळालेली नाही. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आकांक्षा २२ मार्चला वाराणसीत आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबियांना तिच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.