मराठी चित्रपट कथेच्या दृष्टीने खूपच सशक्त असतात, हा साक्षात्कार आता अन्य भाषक चित्रपटांतील कलाकारांनाही होऊ लागला आहे. आयटम साँगच्या माध्यमातून भोजपुरी किंवा अमराठी मुली मराठी चित्रपटांत दिसतातच. पण आता ४५हून अधिक भोजपुरी चित्रपटांत काम केलेली पाखी हेगडे मराठीत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजन खान यांच्या कादंबरीवर येत असलेल्या ‘सत ना गत’ या चित्रपटात पाखी मध्यवर्ती भूमिका करीत आहे. मराठीत काम करण्याची मजा काही वेगळीच आहे, असे मत पाखीने ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले.
मी महाराष्ट्रातच लहानाची मोठी झाले. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे मराठी मातीशी जवळीक आहे. भोजपुरी चित्रपटांत भूमिका करत असतानाही मराठी चित्रपटसृष्टीत नेमके काय चालले आहे, याकडे माझे लक्ष होते, असे पाखीने सांगितले. भोजपुरीतही सशक्त कथानक असलेले चित्रपट करण्यावर आपला भर होता. त्यामुळे मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. ‘सत ना गत’ या चित्रपटासाठी विचारणा झाली आणि आपण योग्य संधीसाठी इतकी वर्षे थांबल्याचे सार्थक झाल्याची खात्री पटली, असे पाखी म्हणाली.
या चित्रपटात सयाजी शिंदे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर अशा बडय़ा कलाकारांसह पाखी काम करणार आहे. उत्तम आणि सशक्त कथानक असलेल्या आणि प्रेक्षकांची वैचारिक भूक भागवणाऱ्या चित्रपटांत काम करण्याची संधी फक्त मराठीतच मिळते, असे मत पाखीने व्यक्त केले. तसेच मराठी मातीशी आपले वेगळेच नाते असल्याने या चित्रपटात काम करताना ती मायेची उब जाणवली, असेही तिने सांगितले.
‘सत ना गत’शिवाय पाखी सध्या आणखी एक मराठी चित्रपट करत आहे. ‘गुलाबी’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात ती मुंबईतील बारबालेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सचिन खेडेकरही मुख्य भूमिकेत आहे. तसेच ‘वुमन फ्रॉम द इस्ट’ या हिंदी चित्रपटातही पाखीने काम केले आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने म्हैस घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून केवळ सहा हजार रुपयांत विकलेली आपली मुलगी आणि त्या भोवती घडणाऱ्या घटनांवर हा चित्रपट आहे. त्यातील मुलीची भूमिका पाखीने साकारली आहे.