करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींनी लावलेली हजेरी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मारलेल्या गप्पा, केलेले खुलासे यांमुळे ‘कॉफी विथ करण’ चांगलाच गाजत आहे. या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री भूमी पेडणेकरने अभिनेता राजकुमार रावसोबत हजेरी लावली. दोघांनीही करणसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकुमारने दीपिकाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली तर भूमीने तिला विराट कोहली आवडत असल्याचं सांगितलं.
यावेळी भूमीने ती यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा एक भन्नाट किस्सा सांगितला. त्यावेळी राजकुमार राव, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, क्रिती सनॉन आणि दिशा पटानी यांचे ऑडिशन घेतल्याचं तिने सांगितलं. ‘या ऑडिशनमध्ये मला जे जे ठीक वाटले ते पुढे गेले. राजकुमार राव ठिकठाक वाटला तर परिणीती अव्वल होती,’ असं तिने सांगितलं. त्यावर ऑडिशनमध्ये ज्यांना तू नापास केलंस आणि ते आज बॉलिवूडमध्ये आहेत असे कोण असा प्रश्न करणने तिला विचारला. त्यावर भूमीने थेट दिशा पटानीचं नाव घेतलं. ‘सुरुवातीच्या काळात दिशा कच्चा लिंबू होती,’ अशी टिप्पणी तिने केली.
दिशा पटानीने २०१६ मध्ये ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘बागी २’मध्ये ती झळकली. आगामी ‘भारत’ या सलमान खानच्या चित्रपटातही दिशाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.