महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचा फोटो ट्विट करत दर्शन घेतले आहे. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाश परिधान करुन दररोज नित्य पूजा तसेच काकड आरती केली जाते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. मंदिर समितीच्या वतीने ट्विटरवर शेअर केलेले फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्ट करत प्रार्थना केली आहे.
“श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ नित्य पुजा काकडा आरती राम कृष्ण हरी”; म्हणत अमिताभ बच्चन यांनी श्री विठ्ठलाचा फोटो ट्विट केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. सुप्रीया सुळे यांनी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोवर विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल अशी कमेंट केली आहे.
“अनावधानाने चूक झाली”, अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी; जाणून घ्या कारण
याआधी अमिताभ बच्चन यांनी करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असताना देवाकडे प्रार्थना केली होती. करोनाशी युद्ध सुरू असताना, बिग बींनी त्यांच्या पोस्टद्वारे डॉक्टरांचे आभार मानले होते. रुग्णालयात दाखल असताना अमिताभ बच्चन यांनी भगवान विठ्ठल आणि देवी रखुमाई यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रार्थना केली होती.
दरम्यान, ओमायक्रॉनच्या संभाव्य भीतीपोटी येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनाची वेळ तासाभराने कमी केली आहे. पूर्वी रात्री १० पर्यंत दर्शनासाठी खुले असणारे मंदिर आता दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. करोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास सक्त मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने दर्शनाच्या वेळेत बदल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.