७५ एमएम एवढा भव्य दिसणारा नाही म्हणून टीव्हीला छोटा पडदा म्हणायचे का? मोठय़ा पडद्यावर चित्रपटांमधून जी करमणूक होते मग तो विनोद असो, कौटुंबिक नाटय़ असो, अमिताभ-सलमान खानसारख्या मोठय़ा चेहऱ्यांच्या करामती असोत आपल्या घरी, आपल्या सवडीनुसार आणि आपल्या रिमोटवर पाहण्याची पर्वणीच सध्या टीव्ही वाहिन्यांनी प्रेक्षकांना दिली आहे. पुढच्या वर्षी तर चित्रपटांमधून दिसणारा अ‍ॅक्शन जॉनरही तुम्हाला छोटय़ा पडद्यावर पहायला मिळणार असल्याने खरोखरच टीव्ही वाहिन्या या छोटय़ा उरणार का?, हा प्रश्न आहे.
यावर्षी रिअ‍ॅलिटी शो आणि त्यांचे सूत्रसंचालक किंवा परीक्षक या नात्याने दररोज टीव्ही माध्यमातून आपल्यासमोर येणारे बॉलिवूड कलाकार आता इथे जास्तच रूळले आहेत, असे म्हणता येईल. कारण, २०१४ मध्ये ही मंडळी रिअ‍ॅलिटी शोजव्यतिरिक्त ‘डेली सोप’ नावाचा प्रकार आजमावताना दिसणार आहेत. अभिनेता अनिल कपूरने हॉलिवूडचा ‘२४’ हा अ‍ॅक्शन शो ‘कलर्स’ वाहिनीवर भारतीय अवतारात आणला. या शोने तरूणवर्गाला नक्कीच आकर्षित केले. मर्यादित भागांचा हा शो संपला असला तरी त्याचे दुसरे पर्व पुढच्या वर्षी पहायला मिळणार आहे. याशिवाय, आणखीही काही अमेरिकन शो भारतीय रूपात आणण्याचे अनिल कपूरचे प्रयत्न आहेत.
अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप ही बॉलिवूडमधील तीन आघाडीची नावे यावर्षी ‘डेली सोप’मध्ये दिसणार आहेत. याचे तपशील अजून फारसे बाहेर आलेले नसले तरी खुद्द अमिताभ बच्चन आपल्या आणि पत्नीच्या या वेगळ्या एंट्रीसाठी फारच उत्सूक आहेत. जया बच्चन पहिल्यांदा सोनी टीव्हीवरच्या मालिकेत दिसणार आहेत. पाठोपाठ अमिताभ बच्चनही वेगळ्या मालिके त ‘अ‍ॅक्शन’ रोलमध्ये दिसणार आहेत. तर आपल्या डेली सोपमध्येही चित्रपटांमधला भव्यपणा असावा, थोडय़ा वेगळ्या शैलीतील कथा असाव्यात म्हणून वाहिन्यांनी कंबर कसली आहे.
एकीकडे ‘महाभारत’, ‘देवों के देव महादेव’, ‘महाराणा प्रताप’, ‘जोधा-अकबर’, ‘बुध्दा’ आणि ‘हातिम’ अशा पौराणिक-ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांवर आपली पकड कायम केली आहे. दुसरीकडे नव्या मालिकाही विविध भव्य लोकेशन्सवर जाऊन चित्रित करण्याचा नवा सपाटा वाहिन्यांनी लावला आहे. ‘कलर्स’ वाहिनीवर येणारी ‘रंगरसिया’ या मालिकेत प्रेम आणि अ‍ॅक्शन असा संगम आहे. ही मालिका जैसलमेरमध्ये चित्रित झाली आहे तर ‘बेइम्तिहा’ ही नव्याने सुरु होणारी आणखी एक प्रेमकथाही भोपाळच्या हवेलीत चित्रित झाली आहे. सोनीवरही दोन नविन मालिका दाखल झाल्या आहेत ज्यात ‘मै ना भुलूंगी’ ही मालिका काल्पनिक शो या प्रकारातली असली तरी ती स्त्रियांच्या प्रश्नावर समर्पित करण्यात आली आहे. तर गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात मांडलेला विषय पुन्हा ‘एक नयी पहचान’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. अभिनेत्री पुनम धिल्लॉं या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
चर्चेतले चेहरे
यावर्षी छोटय़ा पडद्यावरून अनेक नवे चेहरे घराघरातून लोकप्रिय झाले आहेत. त्यात प्रामुख्याने कपिल शर्माचे नाव घ्यावे लागेल आणि पाठोपाठ सुनील ग्रोव्हरचेही. एरव्ही टीव्हीवर लोकप्रिय असणाऱ्या स्टॅंड अप कॉमेडी मालिकांची चौकट मोडून ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा नविन शो कपिल शर्माने ‘कलर्स’वर सुरू केला. आणि त्याला एवढी लोकप्रियता मिळाली की बॉलिवूडमधील प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी कपिलची मेहमाननवाजी बंधनकारक ठरली आहे. शाहरूखपासून ह्रतिक आणि रणबीपर्यंत प्रत्येकाला कपिलने आपल्या तालावर नाचवले आहे. नव्या वर्षांतही त्याची ही जादू कायम राहिल.
कपिलच्या शोमधली ‘गुथ्थी’ म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवरची जास्त चर्चा झाली ती शोमधून त्याच्या बाहेर पडण्यामुळे. सुनील ग्रोवरने हा शो सोडल्यानंतर ‘गुथ्थी’ किती प्रसिध्द झाली होती इथपासून ते त्याने मध्येच शो सोडून जाणे कसे चुकीचे आहे, अशा चर्चामुळे सुनील ग्रोवर हे नाव सगळ्यांच्याच जास्त परिचयाचे झाले.
गौहर खान-कुशल टंडन आणि अरमान कोहली-तनिषा मुखर्जी
‘बिग बॉस’च्या घरातली प्रेमप्रकरणे नविन नाहीत. तिथे प्रत्येक पर्वात अशी कोणती ना कोणतीतरी जोडी चर्चेत असतेच पण, या पर्वात तनिषा मुखर्जी-अरमान कोहली आणि गौहर खान-कुशल टंडन या चौकडीने जो धुमाकूळ घातला त्यामुळे एका क्षणी ‘बिग बॉस’चा सूत्रसंचालक सलमान खानही अडचणीत आला. तनिषाचे अरमान प्रेमप्रकरण आणि तिच्या एकंदरीत वागण्यामुळे तिच्या घरच्यांकडून ‘बिग बॉस’वर विशेषत: सलमानवर आलेले दडपण हा विषय चवीने चर्चिला गेला. तर सलमानचे वागणे तनिषा आणि अरमानच्या बाबतीत कसे दुटप्पी आहे इथपासून ते गौहरच्या प्रेमाखातर बंड करून ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडलेला कुशल आणि त्याला साथ देत बंडखोरी करणारी गौहर यांच्या प्रेमाबद्दल तर खुद्द प्रेक्षकांनी सल्लूमियांची ट्विटरवर कानउघडणी केली.
‘महादेव’ आणि मोहित रैना
‘देवों के देव महादेव’ या लाईफ ओके वाहिनीवरील पौराणिक मालिके ला एवढा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वाहिनीनेही केली नसेल. मात्र, महादेवाच्या भूमिकेतील अभिनेता मोहित रैनाने ही किमया साधली. आज ‘महादेव’ म्हणजेच मोहित हा वाहिनीचा चेहरा ठरला आहे.

Story img Loader