छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चवीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस हिंदी’चा १६ वा सीझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या खास शैलीने तो बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळादेखील घेताना दिसतो.
‘बिग बॉस हिंदी १६’च्या टीमने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अभिनेत्री गौहर खानने या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले. ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वात कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. सलमान खानने या पत्रकार परिषदेत ‘बिग बॉस हिंदी १६’व्या सीझनमधील पहिल्या स्पर्धकाबाबत खुलासा केला. अब्दुल राजिक ‘बिग बॉस’च्या घरातील पहिला स्पर्धक असणार आहे.
हेही वाचा >> Video : ‘मलम पिथा’ गाण्यावर शाळकरी मुलांसह थिरकली कतरिना, व्हिडीओ व्हायरल
सलमान खानने यावेळी त्याची आई ‘बिग बॉस’ बघत नसल्याचाही खुलासा केला. गौहर खानने सलमानला “तुझी आई ‘बिग बॉस’ची फॅन आहे का? त्या शो बघून तुला काही सल्ले देतात का?”, असं विचारलं. यावर उत्तर देत सलमान “माझी आई पूर्वी ‘बिग बॉस’ पाहायची. ‘बिग बॉस’चा १४वा सीझनही तिने पाहिला होता. परंतु, या शोचा १५वा सीझन तिने पाहिलेला नाही. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक होते. सीझनमध्ये काय झालं, याबद्दल तिला काहीच माहीत नाही. ती आता टीव्हीवरील इतर शो पाहते”, असं म्हणाला.
हेही वाचा >> Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी
पुढे तो म्हणाला, “माझी आई ‘बिग बॉस’ बघून मला खूप काही सुचवायची. त्यामुळेच मी एवढ्या चांगल्याप्रकारे हा शो करू शकतो. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचं काहीतरी कर. त्यांची चांगलीच शाळा घे, असं ती मला म्हणायची”. ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या सीझनसाठी प्रेक्षक आतुर आहे.