बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राहुल आणि दिशाच्या लग्नाची तारीख अखेर समोर आली आहे. जुलै महिन्यातच दोघही लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि दिशा लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा होत्या. एवढचं नव्हे तर स्वत: राहुलने ते लवकरच लग्न करणार असून चाहत्यांना याबद्दलची माहिती नक्की देऊ असं सांगितलं होतं. अखेर तो क्षण आता जवळ आला आहे.
राहुल आणि दिशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. दोघांनी एक खास पोस्ट करत आनंद व्यक्त केलाय. राहुल आणि दिशा येत्या १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ” आमत्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने तुमच्या सोबत हे क्षण शेअर करण्यात आनंद होत आहेत. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतोय की १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. प्रेमाचा हा आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करताना आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” असं राहुल आणि दिशाने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
या आधी राहुल वैद्यने सांगितल्याप्रमाणे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसचं राहुल आणि दिशाला अगदी साध्या आणि खाजगी स्वरुपात लग्न सोहळा पार पडावा अशी इच्छा आहे.
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वात राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.