Bigg Boss Marathi. वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणारं एक नाव म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदी मालिका विश्व आणि रिअॅलिटी शोंच्या गर्दीत ‘बिग बॉस’ हे तसं सवयीचच नाव. पण, मराठी कलाविश्वासाठी हे ना तसं नवीन होतं. तरीही प्रेक्षकांनी मात्र या मराठी ‘बिग बॉस’ला काही प्रमाणात पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. मराठी कलाविश्वातील काही प्रसिद्ध चेहऱ्यांच्या साथीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता या घरातही वाद, कलह, मतभेद पाहायला मिळू लागले. सध्याच्या घडीला ‘बिग बॉस मराठी’चं हे पर्व शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे. असं असलं तरीही मागे वळून पाहताना काही गोष्टी आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला प्रकाशझोतात आणणाऱ्या वादांचीच जास्त चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. चला तर मग पुन्हा एकदा नजर टाकूया या घरातील काही वादांवर…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सर्वाधिक चर्चा आणि मतभेद पाहायला मिळाले ते म्हणजे ‘हुकूमशहा’ या टास्कच्या वेळी. सोशल मीडियापासून ते गल्लीबोळापर्यंत प्रत्येक ठिकाणी या टास्कची, त्यातून झालेल्या वादांची चर्चा पाहायला मिळाली. काही काळासाठी या घरात ‘हुकूमशहा’ झालेल्या नंदकिशोरने शर्मिष्ठा आणि सई लोकूर यांना अशी कामं सांगितली ज्यामुळे त्याला महेश मांजरेकर यांच्या रागाचाही सामना करावा लागला. खुद्द महेळ मांजरेकर यांनी ‘मला लाज वाटतेय’, असं ट्विट केल्याचंही पाहायला मिळालं होतं. शर्मिष्ठाने मसाज करुन द्यावा आणि सईने आपल्यासमोर नृत्य करावं, अशी मागणी ‘हुकूमशहा’ नंदकिशोरने केली होती.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

या कार्यक्रमात मेघा, सई आणि पुष्कर यांचं त्रिकुट प्रेक्षकांना चांगलंच आवडत होतं. पण जसजसे दिवस जात होते, तसतसं मात्र त्यांच्यात बरेच वाद होऊ लागले होते. कुठे सईला मेघाचं म्हणणं पटत नव्हतं तर, पुष्करला मेघाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नव्हतं. किंबहुना या वादांमध्ये कोण माघार घेणार, हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करत होता. मुख्य म्हणजे घरात कॅप्टन होण्यासाठीही या वादांना तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं होतं.

सेलिब्रिटींच्या या गर्दीत वयाने आणि अनुभवाने मोठ्या असणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्यासोबतही काही स्पर्धकांचे मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ‘व्हीकेंडचा डाव’ दरम्यान, ‘गुलाम’ आणि ‘ट्युबलाईट’ अशा नावांचे मुकूट देण्याच्या मुद्द्यावरुन आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आणि स्मितामध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

‘चोर पोलिस’ टास्कमध्ये राजेश आणि रेशमच्या बेताल वागण्यामुळे ऋतूजा धर्माधिकारीने त्यांच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अनिल थत्ते यांचं वागणंही अनेकांनाच खटकल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे उषा नाडकर्णी आणि त्यांच्यामध्ये असलेली शाब्दीक बाचाबाची विशेष चर्चेचा विषय ठरली. विविध क्षेत्र आणि तितक्याच विविध स्वभावांचे सेलिब्रिटी या घरात आले आणि पाहता पाहता त्यांची बहुविध रुपं सर्वांसमोर आली. असा हा प्रवास आता अखेरच्या टप्प्यावर आला असून, सर्वकाही मागे सारत कोणात्या डोक्यावर जेतेपदाचा मुकूट स्थिरावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader