आपल्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या बायकांमुळे सैफ अली खान नेहमी चर्चेत असतो. एक म्हणजे त्याची बायको करिना कपूर आणि दुसरी बहीण सोहा अली खान. त्यातल्या त्यात करिना टॉपची अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत फारशी ढवळाढवळ करण्याची संधी सैफला नसली तरी करिनाने असे नृत्य करायला नको होते, वगैरे शेलकी विधाने कळत नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडत असतात. आपल्याच शब्दांचा तीरासारखा सुटलेला बाण करिनाला लागणार आणि त्या जखमेने कृद्ध झालेली करिना आपल्याला घायाळ करणार याची चाहुल लागली की सैफची पळापळ होते. अशीच पळापळ बडे भैय्या सैफना पुन्हा करावी लागली आहे ती बहीण सोहा अली खानसाठी. सोहाने इरफान खानबरोबर दिलेली प्रणयी दृश्ये सैफला रुचली नाहीत आणि त्याच्या तोंडून ती नाराजी व्यक्त झाली.
तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘साहेब, बिवी और गँगस्टर’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सोहाची महत्त्वाची भूमिका आहे. यात तिच्याबरोबर इरफानची जोडी जमली असून त्यांच्यावर काही प्रणयी दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. योगायोगाने सैफही तिग्मांशूच्या ‘बुलेट राजा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका करतो आहे. या चित्रपटाच्या सेटवर असताना तिग्मांशूने उत्साहाच्या भरात ‘साहेब, बिवी..’चे काही रशेस सैफला दाखवले. त्यात अर्थात सोहा आणि इरफानची दृश्येही होती. ते पाहिल्यावर बडे भैय्या सैफ कमालीचे नाराज झाले आणि सोहाने अशी दृश्ये द्यायला नको होती, असे बोलूनही गेले. मात्र, हे बोलल्यावर करिना आणि सैफ अशी दृश्ये देतात तेव्हा चालते. मग सोहाने केले तर काय बिघडले?, अशी चर्चा उठू लागताच सैफने ‘मी असे काही बोललोच नव्हतो’चा पवित्रा घेतला आहे.
याआधीही ‘दबंग २’ मधील करिनाच्या ‘फेविकॉल से’ या आयटम सॉंगवर सैफने नाराजी व्यक्त केली होती. तेव्हाही त्याने आपले म्हणणे मागे घेतले होते. आत्ता तर सोहा, मी आणि करिना आम्ही कलाकार म्हणून काम करतो आहोत. चित्रपटातील दृश्ये काहीही असोत ती आमच्या कामाचा भाग आहेत. त्यामुळे सोहावर किंवा करिनावर मी आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी सारवासारव सैफ ने केली आहे.

Story img Loader