लॅक्मे फॅशन विकदरम्यान येणारा २६ ऑगस्ट हा ‘भारतीय कापड उद्योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून मराठमोळे साज कलेक्शन रॅम्पवर सादर केले जाणार आहे. त्यासाठी जुही चावलासह चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारही सज्ज झाले आहेत. ही मंडळी मराठमोळा साज लेवून रॅम्पवर उतरणार आहेत.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रुती संचेती यांनी राज्यातील विणकरांबरोबर काम करून ‘साज’ हे कलेक्शन तयार केले आहे. भारतीय कापड उद्योग दिनाचे औचित्य साधून २६ ऑगस्टच्या दिवशी ‘साज’ हा फॅशन शो होईल. जुही चावला आणि अन्य काही बडे स्टार हा मराठमोळा साज लेवून रॅम्पवर उतरतील. श्रुती संचेती यांनी यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील विणकरांबरोबर काम केले होते. या वेळच्या फॅशन विकसाठी त्यांची सर्व डिझाइन्स या विणकरांनी विणलेल्या कापडापासूनच तयार झाली आहेत. विदर्भातील २० विणकरांनी श्रुती यांच्या डिझाईन्ससाठी थेट काम केले आहे, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्राच्या हातमाग कलेचे वैशिष्टय़ असणारी पैठणी बॉर्डर, कोयरी, मोर, नथ, करवतकाठ असे वेगवेगळे पॅटर्न आधुनिक पद्धतीच्या कपडय़ांमध्ये वापरल्याचे श्रुती यांनी सांगितले. या शोमध्ये मॉडेल्सच्या पेहरावाबरोबर आणि दागिनेही मराठी परंपरेतील असतील.
वस्त्रमिलाफ
श्रुती संचेती यांच्या कलेक्शनखेरीज आणखी एक मराठी परंपरेतील फॅशन शो यंदाच्या फॅशन विकमध्ये होणार आहे. पुण्याच्या फॅशन डिझायनर हर्षिता चॅटर्जी देशपांडे यांचे ग्रेट मराठा वॉरिअर या नावाचे हे कलेक्शन शनिवारी सादर होणार आहे. हर्षिता यांनीदेखील येवल्याच्या पारंपरिक पैठणीच्या हातमागांमध्ये थोडेफार बदल करून आधुनिक कपडे डिझाईन केले आहेत. पैठणीला थोडा ‘मॅट लुक’ द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बंगाली टसर आणि मराठी पैठणी यांचा मिलाफ त्यांच्या कलेक्शनमध्ये बघायला मिळणार आहे.