Big controversies of 2024 : २०२४ या वर्षात भारतीय सिनेविश्वात अनेक घडामोडी घडल्या. काही चांगल्या घटना घडल्या, त्याचबरोबर काही वादग्रस्त गोष्टीही घडल्या. आज सरत्या वर्षाला निरोप देताना आणि २०२५ या नवीन वर्षाचं स्वागत करताना सिनेविश्वातील टॉप १० वादग्रस्त प्रकरणांवर नजर टाकुयात.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
एप्रिल २०२४ मध्ये, मुंबईतील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. याप्रकरणी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती.
पूनम पांडेच्या मृत्यूची खोटी बातमी
फेब्रुवारी २०२४ मध्ये पूनम पांडेच्या टीमने एक पोस्ट केली होती. त्यात पूनमचे वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे, असं म्हटलं होतं. पण ही बातमी खोटी होती. कॅन्सरबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी ही खोटी बातमी पसरवल्याचं पूनमने म्हटलं होतं. यानंतर इंडस्ट्रीतून तिच्या या स्टंटबाजीवर खूप टीका झाली, त्याबद्दल पूनमच्या टीमने माफी मागितली होती.
पुष्पा 2 चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनला अटक
पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये ४ डिसेंबर २०२४ रोजी चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्याला १३ डिसेंबरला अटक झाली. नामपल्ली कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, मात्र तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. एक रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अल्लू अर्जुनची १४ डिसेंबला सुटका झाली.
हत्याप्रकरणात अभिनेता दर्शनला अटक
कन्नड अभिनेता दर्शनला त्याचा चाहता रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. अभिनेता सध्या जामिनावर बाहेर आहे. जूनमध्ये रेणुकास्वामीचा मृतदेह सुमनहल्ली येथील एका स्टॉर्म ड्रेनजवळ सापडला होता. रेणुकास्वामीने दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडाला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. त्या रागातून दर्शन व पवित्राने कट रचून खून केला होता.
कॉपीराइटवरून नयनतारा – धनुषदरम्यान वाद
नोव्हेंबरमध्ये, नयनताराने धनुषला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं होतं. नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी, नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेलमधील नानुम राउडी धा मधील एका क्लिपच्या वापरावरून धनुषने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसला नयनताराने उत्तर दिलं होतं. धनुषने नेटफ्लिक्स, नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्याविरुद्ध कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर एका मुलाखतीत नयनताराने सांगितलं की त्या बीटीएस क्लिप होत्या.
हेमा समिती अहवाल
ऑगस्टमध्ये, मल्याळम चित्रपटसृष्टीसंदर्भात हेमा समितीने अहवाल सादर केला होता. या अहवालातील खुलाशांमुळे मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. यात इंडस्ट्रीतील काही पुरुषांकडून महिलांवर झालेल्या अत्याचारांची प्रकरणं उघड करण्यात आली होती.
कंगना राणौतना महिला सीआयएसएफ कर्मचाऱ्याने मारलेली झापड
जूनमध्ये, अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांना चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ सुरक्षा अधिकारी कुलविंदर कौर यांनी झापड मारली होती. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी पंजाबमधील महिलांबद्दल केलेल्या कमेंटमुळे कुलविंदरने हात उचलल्याचं म्हटलं होतं.
गोविंदाने स्वतःवर झाडलेली गोळी
अभिनेता गोविंदाने ऑक्टोबरमध्ये चुकून त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या पायात गोळी झाडून घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे पाच वाजता गोविंदा बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली होती.
पॉक्सो प्रकरणात कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक
जानी मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेला तेलुगू कोरिओग्राफर शेख जानी बाशावर त्याच्या सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. ती अल्पवयीन असताना त्याने तिचे लैंगिक शोषण केले होते, असा आरोप तरुणीने केला होता. त्यानंतर त्याच्यावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
IC 814: द कंदाहार हायजॅक सीरिजमुळे वाद
डिसेंबर १९९९ साली दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सचे विमान क्रमांक आयसी-८१४ चे अपहरण केले होते. पाकिस्तानातील ‘हरकत-उल-मुहाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने या विमानाचे अपहरण केले होते. या विमानात एकूण पाच दहशतवादी होते. याच घटनेवर आधारित ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ वेबसीरिज वादाच्या भोवर्यात अडकली होती. निर्मात्यांनी एका विशिष्ट समुदायाशी संबंधित दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी अपहरणकर्त्यांची नावे बदलून ‘शंकर’ आणि ‘भोला’ केली आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.