‘बिग बॉस ११’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोला सुरुवात झाली नाही तोवर त्यात सहभागी झालेल्या स्पर्धंकांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहिण हसिना पारकर हिचा जावई जुबैर खान हा सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. लवकरच जुबैर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण, तो शोमधून बाद होऊन बाहेर पडणार नाहीये. तर यामागचे कारण काही वेगळेच आहे. हसीना पारकरच्या कुटुंबाने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला हा शो सोडावा लागू शकतो.
चित्रपट निर्माता असलेल्या जुबैरने ‘मी हसिना पारकरचा जावई आहे’, असे म्हणत शोमध्ये स्वतःची ओळख करून दिलेली. त्याचसोबत हसिना पारकरवर आलेल्या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी आपण एक असल्याचेही त्याचे म्हणणे होते. आता ‘मिड डे’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचा सदस्य आणि ‘हसिना पारकर..’ चित्रपटाचा सह- निर्माता असलेल्या समीर अंतुले याने जुबैर हे सर्वकाही प्रसिद्धीसाठी करत असल्याचे म्हटलेय.
वाचा : कंगना आणि हृतिकच्या वादाला ट्विटरकडून जोक आणि मीम्सची फोडणी
वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत समीर म्हणाला की, जुबैर हा एक लबाड व्यक्ती असून, त्याचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. प्रसिद्धीसाठी तो दाऊदच्या नावाचा उपयोग करतोय. आम्ही त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही पोलिसांना सांगितले. त्यासह समीरने जुबैरच्या लग्नाची पोलखोल केली. याविषयी तो म्हणाला की, हसिना यांना कुडसिया आणि हुमैरा या दोन मुली आहेत. त्यापैकी कुडसियाशी आपले लग्न झाल्याचा जुबैरचा दावा आहे. पण, तिचे लग्न खरंतर व्यावसायिक झहीर शेख हिच्याशी झाले आहे. त्यामुळे या माणसाने माझ्या बहिणीच्या आयुष्यात कोणतीही ढवळाढवळ केलेली मी खपवून घेणार नाही. माझ्या बहिणीला या सगळ्याचा बराच त्रास होत असून, सर्व अफवा थांबायला हव्यात. जुबैरने तीन वर्षांपूर्वीच लग्न केले होते. त्यानंतर तो त्याच्या पत्नीपासून विभक्तही झाला.
वाचा : … या अभिनेत्रीशीही करण सिंग ग्रोवरने केला होता साखरपुडा
हसिना पारकरवर बायोपिक काढण्यासाठी जुबैरने त्यांना एकदा विचारले होते. मात्र, त्यावेळी हसिनाने त्याला साफ नकार दिला होता. त्यावेळी पारकर कुटुंब जुबैरला ओळखतही नव्हते. ‘इंडिया डॉट कॉम’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील नागपाडा या भागात ‘कंपनी का दामाद हू’ असे म्हणत जुबैरने प्रसिद्धी मिळवली. तसेच लोकांच्या मनात आपल्या नावाची भीती निर्माण केली.
ही सर्व माहिती समोर आल्यानंतर कलर्स वाहिनी अजूनही जुबैरला ‘बिग बॉस’मध्ये ठेवणार का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय.