‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर चांगलाच लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही या शोला विशेष पसंती मिळत असते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असते. या घरात कोणाला प्रवेश मिळणार, यंदाची थीम काय असणार याबाबतच्या अनेक चर्चांना चाहत्यांमध्ये उधाण आलं असतं. त्यातच आता ‘बिग बॉसच्या १३’ व्या पर्वाची चर्चा सुरु झाली आहे.
‘बिग बॉस १२’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलंही होतं. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम हॉरर असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘बिग बॉस १३’च्या यंदाच्या पर्वामध्ये हॉरर ही थीम पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
प्रत्येक पर्वाप्रमाणेच या पर्वाचं सूत्रसंचालनदेखील अभिनेता सलमान खान करणार आहे. त्यासोबतच मुंबईतील फिल्म सिटी येथे बिग बॉसच्या घराचा सेट उभारण्यात आला असून २९ सप्टेंबर २०१९ रोजी बिग बॉस १३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासोबतच १२ जानेवारी २०२० रोजी या पर्वाचा अंतिम सोहळा रंगणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस १२’ मध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. या पर्वामध्ये नेहा पेंडसे, अनुप जलोटा, जस्लीन मथारू , देवोलिना भट्टाचार्य, सृष्टी रोडे, विभा छिब्बर, रिद्धीमा पंडीत,करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीशांत या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस १२’ ची विजेती ठरली.