‘बिग बॉस’ हा शो त्यात रंगणाऱ्या विविध टास्कसोबतच घरातील स्पर्धकांच्या अफेअरच्या चर्चांमुळेही कायम चर्चेत राहिला. नुकतंच या शोचं १४ वं पर्व पार पडलं असून या पर्वातदेखील अनेक स्पर्धक त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात राहिले. यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता अली गोनी आणि जास्मीन भसीन. ‘बिग बॉस १४’ चं पर्व सुरु झाल्यापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे आता ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अलिकडेच अली आणि जास्मीन या दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. हे दोघंही जम्मूसाठी रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे. जम्मूमध्ये अलीचे कुटुंबीय राहत असून त्यांना भेटण्यासाठी जास्मीन अलीसोबत गेल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे जास्मीन आणि अली कुटुंबासोबत लग्नाविषयी बोलणी करण्यासाठी गेल्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, खास जास्मीनसाठी अली गोनी ‘बिग बॉस १४’ मध्ये गेल्याचं म्हटलं जातं. हा शो सुरू झाल्यानंतर जास्मीन थोडी चिंताग्रस्त होती. परंतु, अलीची या घरात एण्ट्री झाल्यानंतर जास्मीनने खऱ्या अर्थाने या शोमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर हा शो संपल्यानंतर अलीने जास्मीनसोबत डेटवर जाण्याची इच्छाही व्यक्त केली.