बिग बॉसच्या १५ व्या पर्वात घरातील सदस्य अभिजित बिचुकले सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक वादग्रस्त कारणं आणि वक्तव्यांमुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं आहे. याशिवाय देवोलिना भट्टाचार्जीसोबत त्याचे अनेकदा वाद होताना दिसतात. पण आता अभिजित बिचुकले एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. घरातील सदस्य तेजस्वी प्रकाशनं अभिजित बिचुकलेच्या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये, घरातील ‘पर्दाफाश रिपोर्टिंग’ दाखवण्यात आलं आहे. ज्यात घरातील सदस्य एकमेकांची पोलखोल करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये तेजस्वी प्रकाश अभिजित बिचुकलेबाबत एक धक्कादायक खुलासा करते. ती सांगते की, ‘अभिजित बिचुकलेनं एका म्युझिक व्हिडीओसाठी ६ तासांचा किसिंग सीन दिला आहे.’ तेजस्वीचा बिचुकलेबाबतचा हा खुलासा ऐकल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य हैराण झालेला पाहायला मिळाला.
दरम्यान याच एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना काही पत्रकार प्रश्न विचारताना दिसणार आहेत. या एपिसोडच्या प्रोमोमध्ये रश्मि देसाई आणि अभिजित बिचुकले यांच्या जोरदार वाद झालेला पहायला मिळतो. पत्रकारांच्या प्रश्नवर रश्मि देसाई, अभिजित बिचुकलेचे महिलांबाबत अतिशय वाईट विचार आहेत असं बोलताना दिसते. ज्यावर बिचुकले तिच्यावर भडकतो आणि तिचं पूर्ण कुटुंब मूर्ख आहे असं म्हणतो.
या प्रोमोमध्ये अभिजित बिचुकले केवळ घरातील सदस्यांशीच नाही तर गेस्टसोबतही बेशिस्तपणा करताना आणि त्यांना उलट उत्तर देताना दिसतो. ज्यामुळे सलमान खान आणि अभिजित बिचुकले यांच्यात वाद होतात. घरातील सदस्यांसोबतच सलमान खानही या प्रोमो व्हिडीओमध्ये अभिजित बिचुकलेवर चिडलेला दिसत आहे.