वाइल्ड कार्ड एंट्री देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत, अभिजित बिचुकले यांच्यामुळे बिग बॉसच्या १५ ची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात हा शो वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. पण वाइल्ड कार्ड एंट्री अभिजित बिचुकले घरातील इतरांसाठी डोकेदुखी ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मागच्या आठवड्यात अभिजितनं देवोलीनाकडे किस मागितलं होतं. ज्यामुळे घरात बराच वाद झाला. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात अभिजितनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

अभिजित बिचुकलेनं मागच्या आठवड्यात अभिनेत्री देवोलीनाकडे किसची मागणी केल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांनी त्याच्या या वागण्यावर आक्षेप घेत त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे आता अभिजित बिचुकलेला घरात एकटं राहावं लागत आहे. अशात अभिजित बिचुकलेनं घरातील काही सदस्यांना विष पिण्याची इच्छा होत असल्याचं सांगितलं. ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

अभिजित बिचुकले निशांतकडे जाऊन त्याला विचारतो की, ‘वॉशरुममध्ये कोणता हेअर कलर आहे का? मला खायचा आहे. मागच्या काही दिवसांपासून घरात जे चाललं आहे त्यामुळे मी वैतागलो आहे.’ ही गोष्ट निशांत, शमिता आणि रश्मी यांना सांगतो आणि त्यानंतर प्रतीक अभिजितला समजावण्याचा प्रयत्न करतो.  

मागच्या आठवड्यात ‘तिकिट टू फिनाले’च्या कार्यात अभिजित बिचुकलेनं देवोलीनाला मदत करण्याच्या बदल्यात तिच्याकडे किसची मागणी केली होती. देवोलीनानं याबाबत सर्वांना सांगितल्यानंतर घरातील जवळपास सर्वच सदस्य अभिजितच्या विरोधात गेलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आपल्या अशा वर्तनाबाबत अभिजितनं कोणाचीही माफी मागितली नव्हती.