कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’ हा शो सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक मानला जातो. नुकतंच बिग बॉसचं १५ वं पर्व संपलं. अखेर काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही बिग बॉसच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. पण यासोबतच या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात आणखी एक खुलासा झाला. होस्ट सलमान खाननं त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत मोठा खुलासा केला आहे.

बिग बॉस १५च्या महाअंतिम सोहळ्याला १३ व्या पर्वातील सदस्य शहनाज गिलनं हजेरी लावली होती. यावेळी ती बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत धम्माल करताना दिसली. शहनाज सलमानची मस्करी करताना म्हणाली, ‘मी आता पंजाबची कतरिना कैफ राहिलेले नाही तर भारताची शहनाज गिल झाले आहे. कारण आता भारताची कतरिना कैफ पंजाबची कतरिना कैफ झाली आहे.’

शहनाज गिलचं बोलणं ऐकून सलमान खान हसू लागतो आणि म्हणतो, ‘तू बरोबर बोलतेयस, सर्व आनंदी आहेत.’ त्यावर शहनाज म्हणते, ‘सर, तुम्ही आनंदी रहा.. सॉरी मी जास्त तर बोलत नाहीये ना? पण सर तुम्ही सिंगल जास्त चांगले वाटता.’ शहनाजच्या या बोलण्यावर सलमान खान उत्तरतो, ‘हो, जेव्हा (सिंगल) असेन तेव्हा जास्त चांगले वाटेल’ हे ऐकून शेहनाजला देखील आश्चर्य वाटते. ती म्हणते, ‘अच्छा, म्हणजे कमिटेड आहात का?’ त्यावर सलमान अर्थपूर्ण हसतो.

शहनाजशी बोलतानाच सलमाननं स्वतःच तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं. दरम्यान महाअंतिम सोहळ्यात राखी सावंत आणि रुबिना दिलेक यांनी २०१२मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अग्नीपथ’मधील कतरिनाच्या ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स केला. कतरिना कैफचं हे गाणे त्यावेळी अतिशय हिट ठरलं होतं. राखी आणि रुबिनाचा डान्स परफॉर्मन्स संपल्यानंतर सलमानने कतरिनाचे नाव घेत ‘कतरिना, लग्नाच्या खूप शुभेच्छा’ असं म्हटलं.

Story img Loader